158 गावे, वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा
अलिबाग : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. एकीकडे उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुसरीकडे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात 30 गावे आणि 128 वाड्यांमध्ये 19 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्याबरोबरच नवीन विंधन विहिरी खोदणे, विंधन विहिरींची दुरुस्ती, नळपाणी योजनांची विशेष दुरुस्ती, पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी झिंक टँकची उभारणी, पिण्याच्या पाण्याचे उद्भव किंवा विहिरींचे खोलीकरण अशी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा आणि विंधन विहिरींची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यात 52 गावे आणि 175 वाड्यांमध्ये विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी 5 गावे आणि 9 वाड्यांमधील कामे पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे उद्भव नाहीत तेथे झिंक टँक उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यात 126 झिंक टँक प्रस्तावित आहेत. मागील दोन वर्षात जिल्ह्यात महाड, पोलादपूर, कर्जत यासारख्या दुर्गम डोंगराळ तालुक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी 22 ठिकाणी झिंक टँकची उभारणी करण्यात आली आहे. यातून एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या गावांची तहान भागवली जात आहे.