’आयुष’ मंत्रालय भारत सरकर, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, एमसीआयएम, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, डॉ. डी. जी. पोळ फाऊंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 हा जागतिक स्तरावरील आरोग्यदायी महोत्सव वाशी येथे झाला. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी उद्घाटनावेळी देशातील प्रत्येकाला ’आयुष’शी जोडण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला ’आयुष’शी जोडण्याचा निर्धार केला आहे.
भारतीय उपचार पध्दती हजारो वर्षे जुनी आहे. वसुदैव कुटुंबकम असे आपली संस्कृती सांगते. प्राणी तसेच मानवाच्या माध्यमातून तपासलेली ही उपचार पध्दती. निसर्गाने आपल्याला जन्माला घातले. पंचतत्वातून शरीर बनले. त्यामुळे निसर्गातील उपचार आपल्यासाठी योग्य आहेत, असे भारतीय उपचार पध्दती सांगते. या उपचार पध्दतीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याचे ध्येय पंतप्रधान मोदी यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे. भारतीय चिकित्सा व होमिओपॅथी विभागाची स्थापना 1995मध्ये झाली. 2003मध्ये याचे नाव बदलण्यात आले व ’आयुष’ ठेवण्यात आले. ’आयुष’च्या कामाला गती तशी नव्हती, परंतु मोदींनी या खात्याला गती दिली. योगाबरोबरच ही उपचार पध्दती जगभर पसरविण्यासाठी ‘आयुष’च्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न आहेत. आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, युनानी, सिद्ध यांसारख्या उपचारप्रणालींचा ’आयुष’मध्ये समावेश होतो. त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी मोदी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या धर्तीवर ’राष्ट्रीय आयुष मिशन’ची स्थापना करण्यात आली आहे. ’आयुष’च्या माध्यमातून आयुर्वेद, होमिओपॅथी, योगाचा वापर वाढत आहे. जागतिक योगदिन आता ’आयुष’च्या माध्यमातून देशात साजरा होत आहे. त्याशिवाय आयुर्वेद शिक्षण देणारे कॉलेज, होमिओपॅथी कॉलेजला मदत करणे, ’आयुष’च्या औषधांमध्ये गुणवत्ता सुधार, नियंत्रणासाठी नियम यावर ’आयुष’ मिशनमध्ये भर देण्यात येत आहे. तसेच वनौषधी लागवडीबाबत जागृती करणे, शेतकर्यांना प्रशिक्षित करणे, शेतकर्यांना आर्थिक मदत करण्यावर भर देण्यात येणार आहे. आयुर्वेदाच्या औषधोपचाराबाबत जागृती निर्माण करताना घरातील पदार्थ उदा. हळद, हिंग, आले, लसूण या पदार्थांचा वापर कसा होऊ शकतो, रासानिक औषधांपेक्षा नैसर्गिक औषधांचा वापर कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ’आयुष’ जगात सर्वांपर्यंत न्यायचे आहे. ’आयुष’बाबत सातत्याने रिसर्च सुरू आहे. ’आयुष’ची 12 सहस्रांहून अधिक केंद्रे चालू केली आहेत. आपले 14 देशांशी करार झाले असून, वर्ल्ड हेल्थमध्ये आपला प्रतिनिधी चार वर्षांपासून जातोय ही मोठी अभिमानास्पद बाब आहे, असेही ना. नाईक यांनी सांगितले. पारंपरिक चिकित्सा प्रणाली, मोफत आरोग्य शिबिर, आरोग्य सर्वांसाठी हे ध्येय ठेवून ’आयुष’कार्य करीत असून वाशीतील आरोग्यदायी उपक्रम याचाच एक भाग आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाशीतील आरोग्यदायी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली व ’आयुष’च्या उपक्रमाला चालना दिली. मोदींच्या अपेक्षेप्रमाणे श्रीपाद नाईक ’आयुष’ सांभाळत आहेत. ’आयुष’चे काम चांगले व्हावे, सर्वांचेच ’आयुष’मान व्हावे, हीच सदिच्छा!