Breaking News

अवयवदानाचा कशेळे ग्रामपंचायत पॅटर्न

कशेळे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा ठराव घेतला आहे. सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने घेण्यात आलेल्या त्या ठरावामागे खरेतर दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा ब्रेनडेड झाल्यानंतर आपल्या शरीरातील अवयवदान करणार्‍या ताराबाई पवार या मुख्य पुरस्कर्त्या आहेत. त्यानंतर मागील दीड महिन्यांपूर्वी भारती भोईर यांनी आपले डोळे दान करून दाखवलेली भूमिका ही कशेळे ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्या अवयवदान करण्याच्या ठरावामागील खरे हिरो आहेत, मात्र महानगरे, शहरे यांच्या ठिकाणी असे निर्णय होऊ शकत नाहीत, पण ग्रामीण भागातील कशेळे ग्रामपंचायत अवयवदान करण्याचे निर्णय घेऊ शकते. यात समाजाची सेवा करण्याचा उद्देश स्पष्ट होत असून कशेळे ग्रामपंचायतचा आदर्श सर्वांनी घेतल्यास डोळे नसलेल्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येईल.किडनी निकामी झालेल्यांना किडनी मिळून त्यांना नवीन संजीवनी मिळेल. शरीरातील अन्य अवयव यांचे रोपण वैद्यक शास्त्रात सहज शक्य असल्याने कशेळे गावाने उचललेले पाऊल निश्चित सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे, पण त्या पाठीमागे आठवडा बाजारात सुई, माळ विकणार्‍या ताराबाई पवार यांचे दोन वर्षांपूर्वीचे अवयवदान सर्वांना प्रेरणा देणारे असेच आहे.

45 वर्षीय ताराबाई पवार यांना 2 सप्टेंबर 2017मध्ये पनवेलच्या एमजीएम रुग्णालयातून ब्रेन डेड म्हणून मुंबईमधील सर जेजे रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पवार यांचे पती यांना अवयवदानाचे महत्त्व सांगितल्यानंतर ताराबाई श्रावण पवार यांचे अवयव देण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रेन डेड असलेल्या भारती यांचे तब्बल सहा अवयव यांचे आवश्यकता असलेल्या अन्य रुग्णांवर रोपण होऊ शकते याची खात्री पटल्यानंतर राज्य सरकारने त्यावेळी आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली. कारण त्यांच्या शरीरातील सर्व सहा अवयव हे जेजेमधील रुग्णांना बसविण्यात येणार नव्हते. त्यामुळे काही ठरावीक वेळेत त्या त्या अवयवाचे रोपण करण्याचे निश्चित धोरण यशस्वी करण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्या दिवशी 5  ऑक्टोबर ही तारीख होती आणि त्या दिवशी ताराबाई यांचा रक्तपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे वैद्यक शास्त्राला तो दिवस आव्हानात्मक असाच होता.

त्यांच्या अवयवदानाचा घटनाक्रम हा आव्हानात्मक असाच होता. ब्रेन डेड रुग्ण ताराबाई श्रावण पवार या 45 वयाच्या महिलेचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.पाच दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूचा रक्त पुरवठा अचानक थांबल्याने त्या बेशुद्ध झाल्या होत्या. 2 सप्टेंबरला त्यांना बेशुद्धावस्थेत सर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि. 4 सप्टेंबर रोजी त्यांना ब्रेन डेड घोषीत करण्यात आले. त्यांचे पती श्रावण पवार जे कर्जत तालुक्यातील कशेळे येथे कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करतात. त्यांनी तसेच त्यांचा भाऊ अंकुश मोहिते आणि मुलगा गणेश यांनी ताराबाई यांच्या शरीरातील अवयवांचे दान करण्यासाठी संमती दिली. त्यानंतर अवयवदात्या ताराबाई पवार यांचे ह्रदय फोर्टीस रुग्णालयातील रुग्णास याचे रोपण करण्यात आले, तर त्यांचे लिव्हर हे नवी मुंबईमधील अपोलो रुग्णालय येथील रुग्णास रोपण करण्यात आले. त्या वेळी ताराबाई पवार यांची एक किडनी ज्युपीटर रुग्णालयातील रुग्णाला आणि दुसरी किडनी आणि दोन डोळे सर जेजे रुग्णालयात उपचार घेत असणार्‍या रुग्णास रोपण करण्यात आले.

ताराबाई पवार कशेळेसारख्या गावात आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालावा म्हणून तेथील गुरुवारी भरणार्‍या आठवडा बाजारात सुई, माळ या वस्तू विकण्याचे काम करीत होत्या.त्यांनी चार रुग्णांना जीवदान आणि दोन रुग्णांना दृष्टिदान देऊन सामाजिक काम करण्याचा वसा मृत्यूनंतरही त्यांच्या स्मृती वेगळ्या आणि आदर्शवत अशा कामाने कायम ठेवल्या.श्रावण पवारसारख्या अशिक्षित व इस्त्री करून उदरनिर्वाह करणार्‍या सामान्य माणसाने आपल्या पत्नीचे अवयवदान करून समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे. अवयवदान करण्यासाठी डॉ. तात्याराव लहाने अधिष्ठाता यांच्या नेतृत्वाखाली जेजे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि सहकारी, तसेच डॉ. अजय भंडारवार आणि टीम, डॉ. भरत शहा व सहकारी, किडनी रोपण करणारे डॉ. व्यंकट गिते व डॉ. गीता सेठ व सामाजसेवा अधीक्षक राठोड, सावरकर व पाटील, डॉ. ननंदकर, डॉ. विद्या नागर, डॉ. मधुकर गायकवाड, डॉ. विकास मैंदाड तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने मेहनत घेतली होती. रामेश्वर नाईक यांनी रात्रभर जागून हे जेजे रुग्णालयातील दुसरे अवयवदान यशस्वी केले. हा आदर्श नंतर भारती भोईर यांनी त्यांच्या मृत्यूनंतर नेत्रदान करून पुढे सुरू ठेवला.

मृत्यूनंतरही मी पाहिले हे जग

 कर्जत तालुक्यातील कशेळे येथील भारती गणेश मते (33) यांनी मृत्यूनंतर नेत्रदान करून हा वारसा पुढे नेला आहे.आजारपणाच्या काळात भारती भोईर यांनी आपल्या पतीला माझा अचानक मृत्यू झाला तर माझे डोळे दान करा. कोणा अंध व्यक्तीच्या जीवनात त्यामुळे प्रकाश येईल आणि त्याच्या माध्यमातून मी हे जग अनेक वर्षे पाहू शकेल, असे सांगितले होते. भारती ही आठ महिन्यांची गरोदर असताना 9 जुलै 2019 रोजी तिच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या आणि प्रचंड त्रास होऊ लागल्याने पती यांनी तिला कशेळे ग्रामीण रुग्णालयात तपासणीकरिता नेले.कशेळे येथे योग्य उपचार होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे कशेळे ग्रामीण रुग्णालयातील सरकारी दवाखान्याच्या रुग्णवाहिकेतून तिला उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु तिची प्रकृती खालावल्याने तेथील डॉक्टरांनी ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यास सांगितले. ठाणे येथे जात असताना प्रसूती वेदनेने तळमळत असणार्‍या भारतीने दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास एका मुलीला जन्म दिला, परंतु त्यानंतर  प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला आणि रुग्णालयात पोहचवून उपचार चालू केले, मात्र त्याच रात्री 11 वाजता त्यांचा मृत्यू झाला. आपल्या पत्नीच्या अचानक निधनाने हतबल झालेल्या पतीच्या डोळ्यांसमोर तिचे पूर्वायुष्य उभे राहिले. आपल्या पत्नीने कधीतरी बोलून दाखविलेली इच्छा आठवली व त्यांनी तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.

या दोन्ही घटना कशेळे गावाचे नाव सामाजिक कार्यात आणखी वरच्या थरावर नेणार्‍या ठरल्या आहेत. त्यामुळे प्रामुख्याने बिनविरोध ग्रामपंचायतमध्ये निवडून गेलेल्या सरपंच आणि सदस्य यांनी आपल्या गावाला ताराबाई पवार आणि भारती भोईर यांनी मिळवून दिलेला वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांच्या पुढाकाराने कशेळे ग्रामपंचायत अवयवदान करणारी ग्रामपंचायत ठरली आहे.त्या ठरावाला पहिली दिशा ताराबाई पवार यांनी दोन वर्षांपूर्वी आणि दीड महिन्यापूर्वी भारती भोईर यांनी दिली आहे. त्यांचे स्मरण प्रत्येक कशेळे ग्रामस्थाने ठेवायलाच हवे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply