Breaking News

आरोग्यम् धनसंपदा

नुकत्याच 25 ऑगस्टला पार पडलेल्या मन की बात कार्यक्रमातही मोदींनी या जनआंदोलनाचे सूतोवाच केले होते. देशातील प्रत्येक नागरिकाला फिट आणि फिटनेसविषयी जागरूक राहताना पाहण्याची आपली इच्छा असल्याचेही मोदीजींनी यावेळी सांगितले. देशातील निरनिराळ्या सामाजिक-आर्थिक स्तरातील जनतेपर्यंत आता फिट आणि निरोगी राहण्याचे फायदे पोहोचवले जातील, याची ग्वाहीही मोदींनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक लहान-मोठ्या गोष्टींमध्ये देशभरातील जनतेला प्रेरित करीत असतात आणि गुरूवारी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने त्यांनी त्याच भूमिकेतून ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला. एकीकडे देश प्रगती करीत असताना, आधुनिक जीवनशैली ही अधिकाधिक बैठी व शारीरिक हालचालींपासून दूर चालली असल्यामुळे दिवसेंदिवस आरोग्यविषयक समस्या या चिंतेची बाब बनत चालल्या आहेत. बैठ्या जीवनशैलीतून उद्भवणार्‍या मधुमेह (डायबेटिस) किंवा हृद्रोगासारख्या समस्यांचे प्रमाण देशात भयावहरित्या वाढते आहे. तिशी किंवा विशीतच नव्हे तर लहान मुलांमध्ये देखील अशा स्वरुपाचे विकार आता आढळून येऊ लागले आहेत. स्थूलपणाची चिंता सर्व वयोगटांतील लोकांना करावी लागते आहे. समाजातील निरनिराळ्या लहानमोठ्या समस्यांच्या बाबतीत आत्मीयतेने व वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणार्‍या मोदीजींनी तमाम भारतीय फिटनेसच्या बाबतीत उदासीन असल्याची खंत व्यक्त केली असून ‘फिट इंडिया’ चळवळीच्या माध्यमातून अवघ्या देशाने निरोगीपणाच्या दिशेने पाऊल उचलले पाहिजे असे आवाहन केले आहे. 29 ऑगस्ट हा दिवस ख्यातनाम हॉकीपटू, दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला. प्रत्येक सर्वसामान्य भारतीय व्यक्तीच्या जीवनात शारीरिक हालचाली व खेळाला रोजच्या दिनक्रमात स्थान मिळावे यासाठी हे जनआंदोलन छेडले जात असल्याचेही मोदीजींनी सांगितले. उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना गुरूवारी 10 हजार पावले चालण्यास तसेच त्याचा नित्यकर्मात समावेश करण्यास प्रेरित करावे असे आवाहनही विद्यापीठ अनुदान आयोगाने केले. फिट इंडिया चळवळीचा शुभारंभ झाल्याचे विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांना थेट प्रक्षेपणातून दाखवले जावे, असेही आयोगाने सुचवले होते. विद्यार्थ्यांच्या कॉलेजातील दिनक्रमात शारीरिक हालचालींचा समावेश करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाची उपाययोजना केली जावी असेही आयोगाकडून सुचवण्यात आले आहे. निव्वळ अशा सूचना करून आता विद्यापीठ अनुदान आयोग थांबणार नसून महाविद्यालयांमध्ये खर्‍या अर्थाते फिटनेस संस्कृती अवतरावी याकरिता आयोगाकडून एक फिटनेस पोर्टल तयार केले जाणार आहे. निरनिराळ्या उच्च शिक्षण संस्थांना या पोर्टलवर आपली यासंबंधातील उपाययोजना व कार्यक्रम अपलोड करणे भाग पडणार आहे. शालेय शिक्षण संपल्यावर अनेक विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाच्या तासाची व त्यात मिळणार्‍या खेळाच्या संधीची उणीव महाविद्यालयीन जीवनात निश्चितच जाणवत असते. पण वाढलेल्या अभ्यासाच्या ताणात या उणीवेकडे मनाविरुद्ध दुर्लक्षच करणे त्यांना भाग पडते. मोदीजींच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या फिटनेस चळवळीमुळे कॉलेजांच्या कॅम्पसवर खेळाला वाव मिळाल्यास लाखो विद्यार्थ्यांची दुवाच मोदीजींना लाभणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply