Breaking News

नेरळमध्ये आचारसंहितेकडे दुर्लक्ष

ग्रामपंचायत निवडणूक; 15 रिक्षांवर विनापरवाना ध्वनिक्षेपक, प्रशासन अनभिज्ञ

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या 17 जागांसाठी 31 ऑगस्ट रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी जिकडे बघावे तिकडे बॅनर लावले असून ध्वनिक्षेपक लावून किमान 15 रिक्षा दिवसभर प्रचार करीत असतात. त्यातील एकही वाहन निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन चालविले जात नाही. निवडणूक यंत्रणादेखील सुस्त आहे. त्यामुळे नेरळमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आचारसंहिता लागू आहे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

कर्जत तालुका निवडणूक यंत्रणेने नेरळमध्ये आर. डी. चव्हाण यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमले आहे. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी आपली प्रचार कार्यालये थाटली आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवाराने जागा मालकांच्या परवानगीची कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दिल्यानंतर प्रचार कार्यालये सुरू करायची असतात, तर बॅनर लावण्यासाठी जागा मालकाची परवानगी, त्या जागेची कर पावती जोडून निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेऊन लावले जातात, मात्र त्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये किती अर्ज आले आणि किती परवानग्या दिल्या त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.

वाहनांना ध्वनिक्षेपक लावून प्रचार करण्यासाठी त्या वाहनाची  सर्व कागदपत्रे, विमा, रोड टॅक्स यांची पूर्तता केली आहे की नाही हे पाहून परवानगी दिली जाते. नेरळमध्ये किमान 15 रिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून जोरदार प्रचार सुरू आहे, मात्र ही वाहने  कोणाचीही परवानगी न घेता प्रचार करीत फिरत आहेत. सकाळी आठपासून ध्वनिक्षेपकाचे आवाज नेरळ गावात घुमत असून, त्या  वाहनांना परवानगी आहे किंवा नाही? हे 27 ऑगस्टपर्यंत पोलीस यंत्रणेला देखील माहीत नव्हते. नेरळमधील एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रारी केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि तहसील कार्यालय सतर्क झाले आहे.

निवडणूक प्रचारात वापरल्या जाणार्‍या ध्वनिक्षेपकाबाबत नेरळमधील नागरिकांच्या सतत तक्रारी येत आहेत. त्याबाबत  संबंधित यंत्रणांना सूचित केले असून, सर्व वाहनांना परवानगी देेताना ठराविक वेळ ठरवून द्यावी आणि त्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारानुसार प्रचार करू द्यावा.

-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत

तहसीलदारांकडून निरोप आल्यानंतर आपण सर्व वाहनांना परवानगी घ्या आणि नंतरच प्रचार करा असे सूचित केले आहे, मात्र निवडणूक यंत्रणेची वाहन परवानगी घेतलेली आणि ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी आम्ही कोणालाही दिली नाही.

-अविनाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक

वाहन परवाना आणि प्रचार कार्यालय परवाना देण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, त्यामुळे त्यासाठी किती अर्ज आले, हे माहीत नाही.

-आर. डी. चव्हाण,निवडणूक निर्णय अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत

नेरळ ही मोठी ग्रामपंचायत असल्याने तेथील परवानग्या घेताना त्रास होऊ नये म्हणून सर्व अधिकार नेरळ ग्रामपंचायतीच्या सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत.

-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी,कर्जत पंचायत समिती

आमच्याकडे बॅनर, प्रचार कार्यालये उघडण्याबाबत अर्ज आले असून त्यांची संख्या 28 ऑगस्टपर्यंत 20 एवढी आहे. ध्वनिक्षेपक लावून प्रचार करण्यासाठी पोलीस विभागाची परवानगी घेण्याच्या सूचना उमेदवारांना करण्यात येत आहेत.

-संजय राठोड, ग्रामविकास अधिकारी, नेरळ

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply