Breaking News

धोनी पर्वाचा अंत?

बीसीसीआयने करारातून वगळले

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार, जागतिक क्रिकेटमध्ये टी-20, आयसीसी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा एकमेव कर्णधार महेंद्रसिंह धोनी युगाचा अस्त झाल्याची चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबतचे वार्षिक करार
गुरुवारी (दि. 16) जाहीर केले आहेत. या करारातून महेंद्रसिंह धोनीला वगळण्यात आले आहे.
इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. या पराभवानंतर धोनी भारताकडून खेळला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीच्या निवृत्तीच्या चर्चादेखील सुरू झाल्या आहेत. धोनीने काही दिवासांपूर्वी जानेवारी महिन्यात निवृत्तीसंदर्भात सांगू तसेच आपण यावर्षी आयपीएल स्पर्धा खेळणार असल्याचे सांगितले होते.
बीसीसीआयने गुरुवारी खेळाडूंसोबतचे वार्षिक करार जाहीर केले. या करारातून धोनीला वगळण्यात आले. बीसीसीआयने ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी क्रिकेटपटूंना देण्यात येणारे मानधन जाहीर केले आहे. याआधी धोनीचा समावेश ग्रेड ए (पाच कोटी)मध्ये होता. धोनी टीम इंडियाकडून 9 जुलै 2009 रोजी अखेरचा सामना खेळला आहे. इतक्या मोठ्या कालावधीपासून धोनी क्रिकेट का खेळत नाही याचे कारणदेखील अद्याप त्याने सांगितले नाही. धोनीला त्याच्या भविष्यातील योजनांविषयीदेखील विचारण्यात आले होते, पण त्यासंदर्भात तो काही बोलला नाही.
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले होते. धोनी यापुढे टी-20 खेळेल, तसेच तो टी-20 वर्ल्ड कपसाठी उपलब्ध असेल, असे शास्त्री म्हणाले होते. धोनीने भारताकडून 90 कसोटी, 350 वन डे आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. या तिन्ही प्रकारांत धोनीने 17 हजार धावा, तर 829 विकेट्स घेतल्या आहेत.
बीसीसीआयने क्रिकेटपटूंना देण्यात येणार्‍या मानधनाचे ग्रेड ’ए प्लस’, ’ए’, ’बी’ आणि ’सी’ असे चार प्रकार करण्यात आले आहेत. ’ए प्लस’मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना 7 कोटी, ’ए’ ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी, ’बी’ ग्रेडमधील खेळाडूंना 3 कोटी, तर अखेरच्या ’ग्रेड सी’मधील खेळाडूंना 1 कोटी मानधन दिले जाईल.
’ग्रेड ए प्लस’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. ’ए ग्रेड’मध्ये आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
’ग्रेड बी’मध्ये वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल हे खेळाडू आहेत. तिसर्‍या म्हणजेच ’ग्रेड सी’मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पंड्या, हनुमान विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply