पुणे ः प्रतिनिधी
पुलवामा हल्ल्यानंतर नागरिकांच्या मनात पाकिस्तानबद्दल राग आहेच, पण त्याचवेळी शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 44 जवानांबद्दल दु:खदेखील आहे. देशातल्या वेगवेगळ्या भागात नागरिक आपापल्या परीने शोक संवेदना व्यक्त करीत आहेत. रविवारी पुण्याहून चेन्नईला जाणार्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांनी स्वतःहून सीआरपीएफच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
180 प्रवासी क्षमता असलेल्या इंडिगोच्या या विमानात 100पेक्षा जास्त प्रवासी होते. प्रवाशांनी स्वतःहून काही मिनिटे उभे राहून वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. बोर्डिंगची प्रोसेस 2 वाजून 10 मिनिटांनी संपल्यानंतर सर्व प्रवासी आपल्या जागेवर बसले होते. काही प्रवासी तिथे ठेवलेले वर्तमानपत्र वाचत होते, तर काही प्रवासी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा करीत होते. परस्परांशी बोलत असताना पुलवामाच्या घटनेबद्दल या प्रवाशांकडून संतापाची भावना व्यक्त होत होती. त्यातल्या काही प्रवाशांनी पुढाकार घेतला व सीआरपीएफच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विमानातील सर्वांना काही मिनिटे उभे राहण्याची विनंती केली. अन्य प्रवाशांनीही त्यास लगेच प्रतिसाद दिला. या सर्व प्रवाशांनी विमानात काही मिनिटे उभे राहून सीआरपीएफच्या बहादूर जवानांना श्रद्धांजली वाहिली. विमानातील काही मिनिटांचे हे वातावरण अगदी भारावून टाकणारे असे होते. प्रवाशांसोबत विमानाच्या केबिन क्रूनेही यासाठी सहकार्य केले.