मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील कर्जत हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. या कर्जत शहरात मध्यवर्ती ठिकाणी रल्वे लाईनच्या शेजारी असलेली, जणू हिरवागार शालू नेसून उभी असलेली तहसील टेकडी, तसेच खंडाळा घाटातून उगम पावून पायी पैंजण घालून जणू ठुमकत ठुमकत नागमोडा प्रवास करीत कर्जत शहरामधून पुढे वाहत जाणारी उल्हास नदी, ज्यामुळे कर्जतचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते, मात्र त्याच कर्जत शहरातील रुक्ष अशा तहसील टेकडीकडे बघून स्वतः नाखूश होणारे राजू पोतदार आज त्यांच्या कार्यकुशल वृक्ष लागवड चळवळीमुळे सर्वांचे आकर्षण बनले आहेत. 1999मध्ये कचेरी रोडच्या खाली निर्माण झालेल्या एका इमारतीत पोतदार राहायला गेले. त्यावेळी त्यांना समोर असलेली ओसाड आणि रुक्ष टेकडी दिसायची. या तहसील टेकडीवर ब्रिटिश काळापासून आजतागायत असलेल्या सरकारी कार्यालयांमुळे येथे कार्यालयीन वेळेत गाड्यांची तसेच माणसांची वर्दळ असते, पण कोणालाही त्या टेकडीवर झाडे लावावीत, जगवावीत असे वाटले नाही. 20 वर्षांपूर्वी पोतदार यांनी आपल्या सहकार्यांसह वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली.
व्यवसायाने फोटोग्राफर आणि वृक्ष लागवडीची आवड असलेल्या राजू पोतदार यांची कलासक्त नजर या ओसाड टेकडीवर गेली आणि त्यांनी पावसाळ्यात या टेकडीच्या परिसरात वृक्ष लागवडीला सुरुवात केली. सुरुवातीला मोजकीच झाडे लावण्यात आली. पावसाळ्यानंतर त्यांना घरून प्लास्टिक कॅनने पाणी घालून ती जगवण्यात आली. सुरुवातीला याकामी घरातील लहान मुले तसेच किरण ओगले या मित्राची मदत होत असे. तसेच काही वेळा दिनेश अडावदकर, महेश भुर्के, इमारतीमधील गजानन गुरव, निश्चल शिंदे तसेच लहान मुले यांची मदत होत होती. मुरमाड जमीन असल्याने झाडांना पाणी जास्त देऊनही झाडे मलूल होत होती. म्हणून तीन-चार वर्षे वेगवेगळे प्रयोग केले.ओलाव्याकरिता झाडाजवळ पाण्याने भरून मडकी ठेवली, तर काही विघ्नसंतोषी नागरिक ती फोडून टाकत असत. अखेर चार वर्षांनी पेप्सी, कोकाकोलाच्या दीड-दोन लिटरच्या तळाला जाड असलेल्या बाटल्यांच्या तळाला लहान छिद्र पाडून पाणी भरून झाडापासून एक दीड फुटांवर खड्ड्यात झाकण लावून उभ्या पुरण्यात आल्या. छिद्रातून माती आत जाऊ नये म्हणून छिद्राखाली एक लहान दगड ठेवण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. कारण या बाटल्या तीन-चार दिवसांनी एकदा पाण्याने भराव्या लागत होत्या, तसेच मुळाजवळ ओलावा राहून झाडे हिरवीगार राहत होती. हा प्रयोग यशस्वी झाला तसेच त्या वेळी या प्रयोगाची दखल घेऊन कृषी विभागाने आपल्या खात्यामार्फत अनेक अभ्यासकांना हा प्रयोग पाहण्यासाठी येथे आणले.
आकाशवाणी मुंबई केंद्रावरून त्याबाबत माहिती दिली जात होती. राजू पोतदार यांनी स्वखर्चाने वृक्ष लागवडीबरोबरच पाणी साठविण्याकरिता पशू, पक्षी, झाडांकरिता पाणपोई असे फलक लावून टाक्या बांधल्या आहेत, तसेच झाडांलगत झाडांना पाणी मिळण्यासाठी शेकडो फूट पाइपलाइनचे काम केले आहे. याकामी त्यांना काही जणांनी वस्तूरूपी मदतही केली आहे. ॐ निसर्ग मैत्री भ्रमंती परिवारातर्फे राजू पोतदार यांनी ठिकठिकाणी वृक्ष लागवडीकरिता स्वखर्चाने झाडांचे मोफत वाटप केले आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात जांभूळ, आंबा, करंज, बोरे, सीताफळ, रामफळ इ. फळांच्या बिया वाळवून त्या तहसील टेकडीवर तसेच दूरवर सहलीला जाताना अगदी महाराष्ट्राबरोबरच अमरनाथ, चारधाम, लेहलडाख, मद्रास, कारगिल, गिरनार, कर्दळीवन व त्या परिसरातील डोंगरदर्यांत टाकल्या आहेत. तसेच ॐ निसर्ग मैत्री भ्रमंती परिवाराच्या माध्यमातून ब्लाइंड पर्सनस असोसिएशनच्या 200-300 दिव्यांग व्यक्तींच्या स्नेहमेळाव्याचे पळसदरी श्री स्वामी समर्थ मठात आयोजन करण्यात आले होते. राजू पोतदार आणि सहकार्यांनी आजवर स्वखर्चाने वृक्षारोपण व संवर्धन करून आंबा, जांभूळ, काजू, बदाम, रामफळ, सीताफळ, जंगली केळी, वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, साग, करंज, कदंब, शिसव, रेन ट्री, बहावा, अशोक, बेल तसेच पारिजात, बकुळ, तगर, चाफा आदी फूलझाडांपासून औषधी व सावली देणारी हजारो झाडे जगविली आहेत. त्यामुळे जमिनीचा कस वाढला आहेच, शिवाय मातीची होणारी धूप थांबण्यास मदत झाली आहे.
नदीमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, फेकण्यात येणारा कचरा, त्यामुळे होणारे प्रदूषण, स्वच्छता अभियान, ठिकठिकाणी वृक्ष लागवडीपेक्षा मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, डोंगरांचे करण्यात येणारे सपाटीकरण, मातीचे होत असलेले अवैध उत्खनन, मातीची होणारी धूप, ठिकठिकाणी लावण्यात येणारे वणवे रोखण्यासाठी पेपरमध्ये पॅम्प्लेट टाकून तसेच विविध माध्यमांद्वारे पर्यावरण रक्षणार्थ ठोस पावले उचलण्याची मागणी राजू पोतदार यांनी केली आहे. श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी -कर्जत येथे मठाच्या उभारणीपासूनच्या सदस्यांपैकी राजू पोतदार हे एक सदस्य असून गुरुपौर्णिमा अन्नदान मित्र परिवारातर्फे राजू पोतदार आणि सहकारी महाप्रसादाच्या आयोजनात सहभागी असतात तसेच मठात उभारण्यात आलेल्या अन्नछत्रातही ते हिरिरीने सहभागी असतात.
18-19 वर्षे अविरत सेवा केल्यामुळे आणि त्यांचे संवर्धन ठेवल्यामुळे हिरव्यागार झालेल्या या टेकडीवरील वनराईत म्हणजे जंगलसदृश झाडीमुळे येथे निरनिराळ्या जातींचे पक्षी येऊन घरटी करू लागले आहेत. तसेच घोरपड, ससे, मुंगुस आदी प्राणी, विविध जातीचे विंचू, सर्प, शॅमेलीऑन सारखा रंग बदलणारा सरडा आदी येथे दृष्टीस पडत असतात. रंगीबेरंगी पक्ष्यांचे होणारे दर्शन, कानावर पडणार्या सुमधुर आवाजाची किलबील, टेकडीवर मिळणारी शुद्ध हवा, पाहायला मिळणारे निसर्गसौंदर्य यामुळे येथे मॉर्निंग वॉकला तसेच सायंकाळी फिरायला येणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून त्यामधील काही जण वृक्ष संवर्धनार्थ मदतही करीत असतात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कर्जतकरांचे फिरण्याचे ते आवडते ठिकाण बनले आहे.
ग्रीन आर्मीचे सभासद असलेल्या राजू पोतदार यांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केले आणि त्यांची आवड
कर्जतकरांची चळवळ बनली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी स्थापन केलेल्या ॐ निसर्ग मैत्री भ्रमंती परिवाराच्या माध्यमातून 10 वर्षांपासून राजू पोतदार आणि त्यांचे सहकारी तसेच टेकडीवर मॉर्निंग वॉकला येणारे काही नागरिक प्रतिवर्षी देखभालीकरिता काही रक्कम जमा करून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात, तसेच त्या झाडांचे संवर्धन राजू पोतदार, दिलीप कदम, जयंत पाटकर, महेंद्र चंदन पाटील, रामकुमार गुप्ता, सोनिया गरवारे, श्रीकांत ओक, संदीप शिंदे आदी आणि दिलीप देशमुख, अनिल खोचरे, रामुलु कावळी, नाना ढाकवळ, पी. के. देशमुख हे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक तसेच फिरायला जाणारे स्त्री-पुरुष झाडांना पाणी घालून आपापल्या परीने झाडांची देखभाल करीत असतात. नुकताच झालेला सांगली, कोल्हापुरातील महाप्रलय पाहता पर्यावरण रक्षणार्थ शासनानेही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
यापुढेही राजू पोतदार सर्व प्रकारच्या वृक्ष लागवडीसह औषधी वनस्पतींची लागवड तसेच संवर्धनाबरोबरच पाणी अडवा, पाणी जिरवण्याकरिता बंधारे बांधणे यांसह पर्यावरण रक्षणार्थ कार्य सुरूच ठेवणार आहेत.
-संतोष पेरणे