नासा या अग्रणी अंतराळ संशोधन संस्थेकडून इस्रोची प्रशंसा झालीच असून चीन, जपान, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी इस्रोचे कौतुक केले आहे. इस्रोनेही आपली मोहीम 95 टक्के यशस्वी झाल्याचे म्हटले असून अर्थातच लँडरशी संपर्काचे प्रयत्न आणखी काही दिवस सुरूच राहतील. देशाचे दुसरे चांद्रयान 22 जुलैला चंद्राच्या दिशेने झेपावल्याक्षणापासून प्रत्येक सजग भारतीयाच्या मनात कुठेतरी चंद्राच्या पृष्ठावर तिरंगा रोवला जाण्याची आस सतत जागी होती. त्या आसेतूनच 7 तारखेला कित्येक जण झोप बाजूला सारून या अंतराळ मोहिमेचा अंतिम टप्पा प्रत्यक्ष पार पडताना तिचे साक्षीदार होण्यासाठी आपापल्या घरातील टीव्हीला डोळे लावून बसले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची ही चांद्र मोहीम अखेरच्या टप्प्यात होती. विक्रम लँडर शेवटचे काही टप्पे पार पाडत अंतराळयानापासून विलगही झाले आणि वेगाने चंद्राच्या पृष्ठभागाकडे झेपावले. त्याचा वेग आवरायचा होता. कारण विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे उतरणे आवश्यक होते. परंतु काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2.1 किमीच्या अंतरावर असताना त्याचा इस्रोच्या प्रमुख केंद्राशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर तिथे केंद्रात जे काही घडले ते अवघ्या देशाने पाहिले. अत्यंत आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची अशी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र झटणार्या शास्त्रज्ञांची मने अखेरच्या टप्प्यातील अपयशाने झाकोळून गेली. पण आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नंतर त्यांच्या सुरात सूर मिसळून अवघ्या देशाने या शास्त्रज्ञांना धीर दिला. अवघा देश खंबीरपणे त्यांच्या पाठिशी अभा राहिला. विक्रम लँडरशी संपर्क तुटला. त्याचा ठावठिकाणा सापडेना. त्याचे नेमके काय झाले असावे हे कळेना. परंतु संपर्क तुटलेला विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला असला तरी तुटलेला नाही हे दोनच दिवसांत हाती आलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. विज्ञानामध्ये निव्वळ प्रयोग आणि प्रयास असतात, तिथे वैफल्याला स्थान नाही, असे अतिशय प्रेरणादायी उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिवशी इस्रोतील शास्त्रज्ञांना धीर देताना काढले होते. अपेक्षेप्रमाणे इस्रोतील तज्ज्ञांनी आपले या मोहिमेवरील प्रयास पुढे सुरू ठेवले असल्याचेच हाती आलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. विक्रम लँडरची कोणतीही
मोडतोड झालेली नाही. अलगद उतरण्याऐवजी वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यामुळे तो तिरका पडलेला दिसतो आहे. परंतु आदळण्यापूर्वीच चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमी अंतरावर असतानाच त्याचा संपर्क तुटला होता. हे नेमके का झाले असावे, याचा शोध आता घेतला जातो आहे. प्रज्ञान रोवरही विक्रम लँडरच्या आत असून लँडरशी संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात, लँडरच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्या तरच त्याच्याशी संपर्क होऊ शकतो हे इस्रोच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जगभरातून इस्रोच्या या मोहिमेचे कौतुक होते आहे. विज्ञानात जसे यश आणि अपयश नसते, तसेच अंतिम असेही काही नसते. इथे असतात ते निव्वळ प्रयोग. विक्रम लँडरच्या संदर्भात अनपेक्षितपणे सामोरी आलेली परिस्थिती मागे टाकून इस्रोने प्रयोगशीलतेच्या निष्ठेतून आपले काम पुढे सुरू ठेवले आहे. ही विज्ञाननिष्ठा अवघ्या देशाला आकळो!