Breaking News

शिकार व पाळीव प्राण्यांचे खेळ; कायद्याआड परंपरा

दक्षिण भारतातील जलीकट्टू आणि पाश्चात्य देशातील बुलफाईट्स असे मैदानी रांगडे खेळ कोकणातील रेड्यांच्या झोंब्यांप्रमाणेच ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली नाळ दाखवितात. कोकणातील पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे अविभाज्य अंग कधी-कधी शहरी सामाजिक संघटनांच्या भूतदयेच्या अनाकलनीय ’सोशल वर्क’मुळे बेकायदेशीर ठरते, तेव्हा रेड्यांच्या झोंब्या, कोंबड्यांची झुंज, मेंढ्यांच्या टकरा, बैलगाड्यांच्या शर्यती अचानक कायद्याच्या कचाट्यात सापडतात. वास्तविक पाहता ग्रामसंस्कृती पर्यटनास चालना देण्यासाठी कोकणात सध्या जे पर्यटकांना ऐश करता यावे यासाठी पर्यटन महोत्सवांचे पेव फुटले आहे त्यात ग्रामसंस्कृतीलाच शहरी बाज आणण्याचे दुर्दैवी कार्य केले जात आहे. पर्यटकांना पर्यटन महोत्सवांसाठी निमंत्रणाची आवश्यकता वाटत असली तरी ग्रामीण जनतेत मात्र या प्राण्यांच्या लढती पाहण्यासाठी कानोकानी खबर लागताच हजारोंच्या संख्येने धाव घेण्याची मानसिकता प्रचंड आकर्षणापोटी दिसून येत आहे.

रेडे, खोंडं, बैल, कोंबड्या, मेंढे, बोकड हे सारे निसर्गत: एकमेकांच्या समोर उभे ठाकताच लढाऊ वृत्तीमुळे एकमेकांचा अंदाज बांधतात. तुल्यबळ असल्यास टक्करही देतात. कधी शेतात, रानात चरताना तर कधी भरबाजारात उकिरडे घोळताना एकमेकांना अनोळखी असल्यास ही जनावरे प्रतिस्पर्ध्याला आव्हान देतात. अशा नैसर्गिकरीत्या झोंब्या-झुंजी गावाकडे सर्वांनाच परिचयाच्या आहेत. ’झोंबी लागली…!’अशी आरोळी कोणी ठोकली तर ती सोडविण्यासाठी नाही तर कोण जिंकतंय हे पाहण्यासाठीच त्याभोवती गावाकडे गर्दी जमा होते. मैदानी कुस्त्यांच्या तालिमी जशा पैलवानांना पोसून आखाड्यात उतरवतात, तसे स्वरूप या ग्रामसंस्कृतीमध्ये रेड्यांना पोसून झोंब्यांसाठी खाचरात उतरविण्यापर्यंत आले आहे. या झोंब्यांवेळी रेड्यांना जास्त इजा होऊ नये यासाठी गुराख्यांची तरुण पोरंही पाठ काढण्यासाठी खाचरात सज्ज असतात. या झोंब्यांचे निर्णय देण्यासाठी पंचक्रोशीत सामाजिक वजन असलेले आणि या झोंब्यांची माहिती असलेले पाच माहीतगार पंचही नेमले जातात. त्यामुळे सोशल वर्क करणार्‍या भूतदयावादी संघटनांना आक्षेप घेण्याचे फारसे कारण उरलेले नाही. ज्याप्रमाणे समुद्रकिनारी वाळूमध्ये बैलगाड्यांच्या शर्यतींवरील बंदी त्या खेळाच्या प्रसाराला मारक ठरली आणि बंदी शिथिल होऊनही कायद्याच्या बडग्यामुळे हा खेळ त्यानंतर फारसा टिकला नाही, तसे रेड्यांच्या झोंब्यांचेही होऊ नये म्हणून ग्रामीण भागात उघड बोलताना सर्वांनाच काहीशी धास्ती दिसून येत आहे. पेटा या संस्थेने ज्याप्रमाणे सर्कशीतील पाळीव तसेच वन्यजीवांकडे भूतदयेने पाहण्यासाठी कायदा करण्यात यश मिळविले, त्याप्रमाणेच पारंपरिक मैदानी खेळ असलेल्या रेड्यांच्या झोंब्यांचेही संरक्षण करण्याची गरज आहे.

पोलादपूर, महाड, खेड, मंडणगड तालुक्यांतील ग्रामीण जनतेला पोलिसी खाक्यामुळे कुठेतरी हा पारंपरिक खेळ बेकायदेशीर असल्याचे भासविले जात असले तरी कायदा-सुव्यवस्था जनतेसाठी आहे आणि लोकप्रतिनिधींनी या ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्याची गरज आहे, असेही झोंब्यांच्या शौकिनांना मनोमन वाटत आहे. ’तिकडं झोंब्या हैत…!’ कळल्यावर झोंब्यांच्या ठिकाणी धाव घेण्याची जी मानसिकता दिसते, तेवढी मानसिकता कोणत्याही राजकीय पुढार्‍याच्या सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी दिसत नाही. सूर्य मध्यान्हीला येण्यापूर्वी झोंब्या आटोपत्या घेतल्या जातात म्हणून रातोरात किंवा रामप्रहरी बैलगाड्या, रिक्षा, मोटारसायकली किंवा मिळेल त्या वाहनाने अथवा पायी चालत तब्बल पाच हजारांहून अधिक गावकरी तेथे पोहचतात. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद जाहीर निमंत्रणाविना या खेळाला मिळत आहे. पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर, कापडे, तुर्भे, दिविल, धारवली, देवळे, कोंढवी, वाकण तसेच महाड तालुक्यातील आंबवडे, कुर्ला, किंजळोली, नागाव, शिरवली, कोल, तर दहागाव आणि भोंबडी या गावांतील रेडे हे आतापर्यंत झालेल्या झोंब्यांतील ’फायटर’ ठरले आहेत. यात दिवीलचे मोरे, पोलादपूरचे हांडे, कोंढवीचे जंगम, कुर्ल्याचा बबनबुवा अशी रेड्यांच्या मालकांची नावेही विजेत्या रेड्यांचे पालक म्हणून चर्चेत आहेत. कधी कधी खाचरात लिंबं पेरल्यानं रेडं झोंबी घेत नाहीत, असा अंधश्रध्देचाही सूर ऐकायला येतो. जिंकणार्‍या रेड्यांचे डावपेच ती मुकी जनावरं जरी सांगू शकत नसली तरी त्या डावपेचांची वर्णने झोंबी पाहून आलेले शौकीन फार माहीतगार असल्याच्या थाटात करतात. देऊचा रेडा हा पोलादपूर तालुक्यातील प्रचलित शब्दप्रयोग उर्मट-उन्मत्त माणसासाठीही वापरला जातो इथपत येथील ग्रामीण संस्कृतीवरच नव्हे तर मराठी भाषासंस्कृतीवरही या खेळाचा प्रभाव दिसून येतो. झोंब्यांनंतर परतलेल्यांच्या तोंडी रेड्यांची वर्णने, ’शिंगानं टोकरा…झकास पारजलेल्या हत्याराचा…मागच्या चौकाला गच्च बांध्याचा…निस्ता आंबवण खाऊन फोसकट….फिरत्या रानातला गडी…म्होरल्या पायांना आखूड…ढूसकावणारा…शिंगाचा मारा…..मोठ्या बांधाचा…’अशा शब्दप्रयोगानिशी असतात.

मार्गशीर्ष महिन्यामध्ये तालुक्यातील शेतकरीवर्ग गोठ्यात बांधलेल्या बैलांची अकड म्हणजे सुस्तावस्था कमी करून त्याच्यामध्ये चुणचुणीतपणा आणण्यासाठी बैलदिवाळी साजरी करतो. यामध्ये बैलाच्या शिंगाला बांधलेला झुपकेदार तुरा ओढून काढण्याचा मर्दानी खेळही समाविष्ट असतो. याचदरम्यान रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होतात. बैलदिवाळी आणि बैलगाड्यांच्या शर्यती सुरू असतानाच अलीकडे गुपचूप काही गावांतील रेड्यांच्या झोंब्यांची माहिती सर्वत्र पोहचते आणि हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या भागातील झोंबीचे शौकीन झोंबी असलेल्या गावाकडे आवर्जून जातात. सध्या महाड व पोलादपूर तालुक्यांमध्ये अशा प्रकारच्या रेड्यांच्या झोंब्यांचे सत्र कोकण पर्यटन या सदराखाली न येताच गुपचूपपणे सुरू असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. पौष पौर्णिमेला देव पारधीला जाण्याची प्रथा कोकणात सर्वत्र पाळली जाते. पौष महिन्यात अनेक शुभकार्य टाळली जात असतात. त्यामुळे एक दिवस संक्रांत आणि अनेक दिवस किंक्रांत असा मांसाहारी महिना असल्याचे काही मांसाहार शौकिनांकडून या महिन्याचे सर्व दिवस शिकार म्हणजेच पारध करून साजरे केले जातात.

पौष पौर्णिमेपासून देव पारधीला निघालेत या जुन्या रूढ परंपरेतून शिकार म्हणजेच पारध करण्याची परंपरा तत्कालीन दंडकारण्यात म्हणजे सध्याच्या महाड, पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, खेड, मंडणगड, दापोली अशा तालुक्यांमध्ये पाहण्यास मिळते. या तालुक्यांच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या रानडुकरे, मोर, लांडोरी, रानकोंबडे, ससे, रानमांजर, साळींदर, भेकर अशा वन्यजीवांची सर्रास पारध करण्याचा प्रकार गावकी स्वरूपात सुरू झाला आहे. या महिन्यामध्ये पारधीचा प्रकार केवळ शेतीस त्रासदायक अशा वन्यजीवांचा संहार करण्याच्या हेतूने अनेक वर्षांपासून केला जात असतो. या पारधीची परंपरा जोपासण्याकामी अनेक गावांतून मानकरी, सेवेकरी, गावकी व भावकीचा पुढाकार दिसून येत असतो. अनेकदा पारधीसाठी विद्युत पुरवठा केलेली जाळी, सापळा, बंदूक आणि भाले-खोचेर्‍यासारखी तीक्ष्ण हत्यारांचा वापर केला जात असतो. पोलादपूर तालुक्यातील वन्यजीवन समृध्द असल्याने या भागात शहरातून शिकारीला येणार्‍यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. या काळात अनेक फार्म हाऊसमध्ये रानडुकरे आणि ससे तसेच भेकरांच्या मांसाहारी पार्ट्या झडत असून, ग्रामस्थदेखील रानडुकरांच्या मांसाचे वाटे करून आपापल्या घरी सागुती शिजवत असल्याची परंपरा कायम आहे.

पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण परंपरेआड न येण्याची दक्षता सातत्याने निवडणुका आणि राजकारण्यांना लोकाश्रय मिळविण्याची अपरिहार्यता असल्याने पोलीस, वनविभाग आणि प्रशासन घेत असल्याने कोकण पर्यटनाचा गुपचूप आनंद घेण्यासाठी पोलादपूर तालुका सध्या शहरी शिकारीबाबूंच्या रात्रीच्या वर्दळीने सर्वदूर ख्याती प्राप्त झालेला आहे.

-शैलेश पालकर

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply