आजपासून नवरात्रोत्सवाची धूम
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यामध्ये रविवारपासून (दि. 29) शारदीय नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. सकाळी ढोलताशांच्या गजरात दुर्गामातेचे आगमन झाले. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 1294 ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
नवरात्रोत्सव हा गुजरात राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी महाराष्ट्रातही सार्वजनिक मंडळांमार्फत गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येते. रायगड जिल्ह्यातही नवरात्रोत्सव काळात दुर्गामातेची स्थापना करून रासगरब्याचे आयोजन सार्वजनिक मंडळ व खासगी ठिकाणी केले जाते. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तयारी केली असली तरी पावसाची भीती त्यांना सातावत आहे. यावर्षी पावसाने आपला मुक्काम वाढवला आहे. अजूनही आकाशात ढग दाटून आलेले दिसत आहेत. अधूनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहेत.
या नवरात्रोत्सवात नऊ दिवस धामधूम असते. देवीसमोर रासगरबा नाच केला जातो. तसेच रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही होत असतात. पारंपरिक पध्दतीने हा उत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. रायगडात 1113 सार्वजनिक मंडळे व 181 खासगी ठिकाणी अशा एकूण एक हजार 294 दुर्गादेवीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे, तसेच 194 सार्वजनिक मंडळे, तर 1452 खासगी ठिकाणी अशा एकूण एक हजार 646 देवीच्या घटाची स्थापना जिल्ह्यात करण्यात आली आहे, तसेच 271 सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी देवीच्या फोटोची स्थापना करून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सव काळात गरबा खेळताना या वेळीदेखील वेळेचे बंधन असल्याने पहिले सात दिवस 10 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. शेवटचे तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक लावण्यास परवानगी दिली जाणार आहे. गरब्याला या वर्षी काय नवीन, हा प्रश्न तरुणांसमोर असतो. खासकरून बाजारात नव्याने येणार्या पेहरावाचे आकर्षण असते. या वेळी चनिया चोळी या पारंपरिक पेहरावाचे बदलते इंडो-वेस्टर्न लूक हल्ली पाहायला मिळतात, तर यात जीन्स, जॅकेट, ऑक्सिडाईज्ड दागिने यांचा यात समावेश आहे. सुंदर, अनोखा आणि अगदी कॅज्युअल असा हा लूक तरुणांना आवडताना दिसत आहे.
वेणगाव येथील जागृत श्री महालक्ष्मी देवी
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर कर्जत-जांभिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मी स्वयंभू देवस्थान आहे. हे महालक्ष्मी देवस्थान अतिप्राचीन असून पंचक्रोशीत तसेच बाहेरही प्रसिध्द आहे. 1857च्या आंदोलनातील पुढारी नानासाहेब पेशव्यांचा जन्म या वेणगाव गावी झाला. या गावातील मंदिरात नवरात्रीला श्री महालक्ष्मी उत्सव व यात्रा भरत असल्याचा उल्लेख महाराष्ट्र राज्य गॅझेटियर रायगड जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ पान. नं. 864 मध्ये आहे. या देवास्थानची आख्यायिका अशी सांगितली जाते की, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीला भेटण्यास जाताना तिच्या रथाचे चाक घसरले व थोड्याच अंतरावर रथाच्या एका घोड्याचा पाय घसरला. त्यामुळे श्री महालक्ष्मी तेथेच वास करून राहिली. ते ठिकाण म्हणजेच सद्यस्थितीतील वेणगावातील श्री महालक्ष्मी मंदिर होय. देवीच्या रथाचे चाक व घोड्याचा पाय जेथे घसरला ती ठिक़ाणे मंदिर परिसरात आजही पाहावयास मिळतात. सुमारे 200 वर्षांपूर्वी वेणगाव येथील एका गावकर्याच्या स्वप्नात देवीने येऊन येथे वास करीत असल्याचा दृष्टांत दिला. त्यानंतर गावकर्यांनी तिथे निवारा बांधला व श्री देवीची दैनंदिन पूजाअर्चा, सांजवात सुरू केली व ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. काळाच्या ओघात मंदिर जीर्ण झाले होते, तसेच भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी विश्वस्त समितीने 1997मध्ये या श्रध्दास्थानाचा जीर्णोध्दार केला. देवीचे स्थान स्वयंभू असून तिच्या नवसाची प्रचिती अनेक भक्तांना आली असल्याने कर्जत पंचक्रोशी तसेच लांब लांबून भक्तगण श्री महालक्ष्मीच्या दर्शनास अखंड येत असतात. हे मंदिर अतिशय रम्य अशा ठिक़ाणी आहे. आजूबाजूला डोंगर, शेती, वनश्री असल्याने या परिसरात आल्यावर खूपच प्रसन्न वाटते. ट्रस्टतर्फे त्रिपुरा पौर्णिमा, हनुमान जयंती, होळी पौर्णिमा, सीमोल्लंघन व माघी गणेशोत्सव आदी कार्यक्रम केले जातात. नवरात्रीत नऊ दिवस दर्शनासाठी गर्दी होते. नऊ दिवस येथे पूजा, सप्तशक्ती पाठ, पठण, अभिषेक, भजन-कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. घट उत्थापनाच्या दिवशी नवचंडीचा होम केला जातो.
श्री महालक्ष्मी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिध्द आहे. या परिसरातील बाहेरगावी असलेले ग्रामस्थ तसेच तालुक्यातील भाविक या नऊ दिवसांत येऊन आवर्जून देवीचे दर्शन घेतात. अगदी दररोज चार-पाच किलोमीटर अनवाणी येणार्यांची संख्यासुध्दा मोठी आहे. आम्ही समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करीत असतो.
-रंजन शिवराम दातार, अध्यक्ष
नेने महाविद्यालयात शारदीय व्याख्यानमाला
पेण : प्रतिनिधी
येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरदरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 30) आनंद यात्रा या विषयावर श्रृती राजे मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी (दि. 1) संस्कृत भाषेतील करिअर या विषयावर मितेश आणि अर्चना कटीरा, गुरुवारी (दि. 3) जनुकीय तंत्रज्ञान आणि मानव या विषयावर ॠषिका दांडेकर व संगीता चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी (दि. 4) अर्थव्यवस्था आणि मंदी यावर चंद्रशेखर नेने, तर शनिवारी (दि. 5) प्रा. देविदास बामणे हे हिंदी गजलो में आम आदमी आणि सोमवारी (दि. 7) कवितांचे जग या विषयावर मंदार ओक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रम नेने महाविद्यालय सभागृहात रोज सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याचे प्राचार्य सदानंद धारप यांनी सांगितले.
नागोठण्यात नवरात्रोत्सव
नागोठणे : प्रतिनिधी
येथील नवरात्रोत्सवास रविवारपासून धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. नागोठणे शहरासह विभागात 35 ठिकाणी मंदिरात देवीची घटस्थापना करण्यात आली, तर 13 ठिकाणी घट आणि सात ठिकाणी देवीच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली आहे.
या नऊ दिवसांत गरबा तसेच विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. नागोठण्यातील श्री जोगेश्वरी मंदिरात रोज रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. नवरात्रीत कायदा-सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अधिकारी, 15 पोलीस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे 10 जवान विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती हेड कॉन्स्टेबल निलेश महाडिक यांनी दिली.
रोह्यात भाटे वाचनालय शारदोत्सवास सुरुवात
रोहा ः प्रतिनिधी
येथील भाटे वाचनालयाच्या शारदोत्सवास रविवारी (दि. 29) सकाळी वाचनालयाचे उपाध्यक्ष वसंत भट यांच्या हस्ते शारदापूजन करून सुरुवात करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे, माजी अध्यक्ष वत्सराज, ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. बाळाराम शेळके, श्रीनिवास वडके, कुंडलिका पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, माजी संचालक निखिल दाते आदी या वेळी उपस्थित होेते. या शारादोत्सवात रोज संध्याकाळी अध्यात्मिक, समाज प्रबोधन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सोमवारी आरती धारप, ज्योती शिंदे, अचला धारप यांचा नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी गौराई मंडळाचे मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, बुधवारी शब्दांकुर प्रस्तुत सुमधुर कवितांचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी कॅप्टन आनंद बोडस (नाशिक) यांचे व्याख्यान, शुक्रवारी कीर्तनकार हभप छाया गोखले यांचे भजन, शनिवारी महालक्ष्मी
मंडळातर्फे महालक्ष्मी पूजन, रविवारी वीणा जोगळेकर (पुणे) यांच्या गाण्यांची मैफल, सोमवारी जागृत पाटील (पेण) यांचे व्यक्तिमत्त्व विकास विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे यांच्या हस्ते या शारदोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.