मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात रानगवे आढळून आले आहेत. त्यामुळे पशु-पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांना ही नवी पर्वणी मानली जात आहे. वनविभागाने रानगव्यांच्या वावरास दुजोरा दिला आहे.
मुरूडपासून 14 किमी अंतरावर फणसाड अभयारण्य असून, त्याचे क्षेत्रफळ 54 चौमी आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे महाबळेश्वर, माथेरान यासारख्या उंच टापूत आढळणार्या वनस्पती येथे पाहायला मिळतात. या ठिकाणी विविध वन्यजीवांबरोबरच वनौषधीदेखील आहेत. येथील जंगलात मोठ्या प्रमाणात ऐन, साग, किंजळ, सावर, कुंभी, भोकर, पांगारा, पायर, करंज, हेद, काजू, डंबर, खवस, कोकम, जारूळ, मोहा, कळंब, अर्जुन आदी वनसंपदा आहे. त्याचप्रमाणे बारमाही वाहणारे नैसर्गिक झरे आहेत. त्यांना ग्रामीण बोलीत ‘गाण’ संबोधतात. अशी सुमारे 27 गाणी आहेत.
फणसाड अभयारण्यात वन्यप्राण्यांमध्ये बिबट्या, रानमांजर, सांबर, वानर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, पिसोरी, शेकरू आदींचा वावर असतो; तर सरपटणार्या जीवांमध्ये नाग, अजगर, मण्यार, फुरसे, घोणस, हरणटोळ, धामण आदी सर्पांच्या जातींचा समावेश आहे. आता येथे रानगवे आढळले आहेत. या अभयारण्यात यापूर्वी रानगवे नव्हते, परंतु अचानकपणे त्यांची पैदास वाढलेली दिसून येते. म्हशीसारखे काळे असणार्या या गव्यांच्या पायाचा खालील भाग व शेपटीला सफेद केस असतात. खूप वजनी व प्रचंड खाद्य खाणार्या या गव्यांची सुमारे 12 इतकी संख्या असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
रानगवे कळपात राहणे अधिक पसंत करतात. वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील जंगल भागात हे रानगवे आढळून आले आहेत. फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे दिसल्याने ते पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. याबाबत वनविभागानेही आनंद व्यक्त केला आहे.