कर्जत : बातमीदार
सगुणा वनसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून वणवे रोखण्याचे काम केले जात आहे. या कामाची माहिती घेण्यासाठी वन विभागाचे अप्पर सचिव मोहन कर्नाट यांनी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी अनेक डोंगर चढून वणवे रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. वन विभागात वेगळे व्हिजन ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून मोहन कर्नाट ओळखले जातात. त्यामुळे वणवे रोखण्यात यशस्वी ठरलेले सगुणा वनसंवर्धन तंत्र हे राज्यातील वणवे रोखण्यास मदत करणारे ठरते काय, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. कृषिरत्न पुरस्कारप्राप्त शेखर भडसावळे यांनी जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी सगुणा वन संवर्धन तंत्र शोधून काढले आहे.त्यात जंगलात वणवे लागू नयेत यासाठी जाळ रेषा तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जंगलातील टेकड्यांवर जंगली वनस्पती लावून घेतल्या. त्यामुळे हे डोंगर वणव्यांपासून रोखले गेले. सगुणा वन संनवर्धन टीमसोबत गेली दोन वर्षे वन विभाग काम करीत आहे. राज्याच्या वन विभागाचे सचिव सतीश खारगे यांनीदेखील मागील वर्षी या कामाची पाहणी करून असा प्रयोग सर्व ठिकाणी राबविण्यासाठी वन विभाग पुढाकार घेईल, असा विश्वास दिला होता.
यावर्षीही राज्याच्या वन विभागाचे सहाय्यक सचिव मोहन कर्नाट यांनी सगुणा वन संवर्धन तंत्राने केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी नेरळ गाठले. त्यांनी शेखर भडसावळे आणि टीमसोबत टपालवाडी आणि माणगाववाडी येथील दोन डोंगर पालथे घातले आणि जाळ रेषा आणि जंगली झाडांची लागवड यांची पाहणी केली. त्यांच्यासोबत वन अधिकारी नारायण राठोड, सगुणा वन संवर्धन तंत्राची जबाबदारी पाहणारे अनिल, वनपाल दत्तात्रय निरगुडा यांच्यासह वन कर्मचारी व सगुणा वन संवर्धन टीमचे सदस्य या वेळी उपस्थित होते.