पाली : प्रतिनिधी
सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवी तालुक्याचे शक्तिपीठ मानण्यात येते. अश्विन नवरात्रीमध्ये तालुक्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर गर्दी करतात. सध्या त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. सुधागड किल्ल्यावर प्राचीन काळातील श्री भोराई देवीचे मंदिर आहे. या देवीची स्थापना भृगऋषींनी केली आहे. म्हणून या देवीला भृगअंबा, भोरंबा, भोराई अशी नावे आहेत. देवीची मूर्ती तीन फूट उंचीची आहे. मूळ चंडिकेचे स्वरूप असणारी श्री भोराई देवी चतुर्भुज आहे. भोरच्या पंतसचिवांनी या देवीला आपली कुलदेवता व कुलस्वामिनी मानून येथील पुरातन मंदिराची पुनर्बांधणी केली होती. मंदिरासमोर दगडी उंच दीपमाळ आहे. देवळात पोर्तुगीज घाटणीची मोठी घंटा आहे. पंतसचिव चिमणाजी रघुनाथ उर्फ नानासाहेबांनी पुत्रप्राप्तीसाठी देवीला नवस केला होता. त्यांची मनोकामना पूर्ण झाली. तेव्हापासून येथील मंदिरात 10 दिवसांच्या अश्विन नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. त्या काळात हा उत्सव साजरा करण्याची जबाबदारी मामलेदारांवर होती. त्या काळात मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक, दुपारी गाणे, सायंकाळी आरती, रात्री कीर्तन असा कार्यक्रम असे. अष्टमीच्या दिवशी गडकर्यांना मानाप्रमाणे नारळ व मानाचे विडे देत असत. शतचंडी होमासाठी ब्राह्मण गडावर येत. सनई, चौघडा, संबळ, शिंगे, तुतार्या, ढोल वाजविले जात असत. शिलंगणाच्या दिवशी पालखी निघत असे. आजही भोराई देवी देवस्थान मंडळाचे विश्वस्त गडावर नवरात्र उत्सव पूर्वापार पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवरात्रात हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक आजूबाजूला गर्द झाडीने नटलेला मनोहरी परिसर, वाहते धबधबे, नद्या, डोंगर रांगा, हवा याचाही आनंद लुटतात.