मेंदडी गावात प्लास्टिकबंदी जनजागृती फेरी
म्हसळा : प्रतिनिधी
आम्ही प्लॉस्टिक वापरणार नाही आणि गावातही वापरू देणार नाही, अशा घोषणांनी मेंदडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात फेरी काढून प्लास्टिकबंदीविषयी जनजागृती केली. या वेळी मुलांनी चौक सभा घेऊन प्लास्टिक आपल्या गावाकडील वातावरणाला कसे घातक आहे, ते सांगितले. या वेळी स्वच्छतेची व तंबाखूमुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली. या वेळी काढण्यात आलेल्या रॅलीत प्लास्टिक हटाव जीवन बचाव, स्वप्न आपणा सर्वांचे प्लास्टिकमुक्त भारताचे, गाव सारा स्वच्छ करू, प्लास्टिक पिशवी हद्दपार करू, हम सब का एकही नारा प्लास्टिक हटाना लक्ष हमारा, कापडी पिशवी वापरा पर्यावरण वाचवा, अशा घोषणा देण्यात आल्या. आजूबाजूचे प्लास्टिक कागद, पिशव्या, बाटल्या व अन्य वस्तू विद्यार्थ्यांनी गोळा केल्या. या रॅलीत मेंदडी गावातील मराठी व उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी होत्या. प्लास्टिकमुळे होणार्या दुष्परिणामांचा विचार करून केंद्र व राज्य शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. त्यानुसार समाजातील सर्व घटकांनी गावात प्लास्टिकबंदीबाबत जागृती करून प्रदूषणमुक्त करावे, असे आवाहन या वेळी मुख्याध्यापक किशोर मोहिते यांनी केले. तंबाखूत असणार्या निकोटिनसारख्या घातक पदार्थाच्या दुष्परिणामांची माहिती देऊन अब्बास शेख सरांनी प्रत्येकाने आपले कुटुंब तंबाखूमुक्त बनवा, असे सांगितले. या वेळी गीतांजली भाटकर, सायली बिर्जे, मयुरी पाटील, प्रियंका गोसावी, अब्बास शेख, उर्दू शाळेतील शबाना जालगावकर, अमीना सोलकर तसेच अंगणवाडी सेविका उर्मिला कांबळे, मदतनीस सुचिता कांबळे, विजयश्री कांबळे, रूपाली पाटील यांनी विशेष सहकार्य केले.