नागपूर ः प्रतिनिधी
नागपूरमधून विधान परिषदेसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यानिमित्ताने भाजपने सोमवारी (दि. 22) नागपुरात शक्तिप्रदर्शन केले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हाला अतिशय आनंद आहे की, आमचे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा विधान परिषदेत येत आहेत. त्यांनी मंत्री म्हणून उत्तम काम केले आहे, तसेच एक जागरूक लोकप्रतिनिधी कसा असतो, हेदेखील दाखवून दिले आहे. गेल्या दोन वर्षांत पक्षाचे महामंत्री म्हणून बावनकुळे यांनी अतिशय चांगले काम केले. त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे.
विधान परिषदेचे काम करण्याची जबाबदारी दिल्यामुळे पक्षाचे आभार! विदर्भ आणि नागपुरातील प्रश्न मी महाराष्ट्र विधान परिषदेत मांडेन.
-चंद्रशेखर बावनकुळे
भाजपच्या माघारीमुळे प्रज्ञा सातव बिनविरोध
हिंगोली ः राज्यात सध्या विधान परिषदेची रणधुमाळी आहे. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून आल्या आहेत. याबद्दल काँग्रेस नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपचे आभार मानले आहेत.