कर्जत ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या 399व्या शिबिरात 106 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अध्यक्ष कै. परेश पांडे व सदस्य कै. जितेंद्र जोशी यांच्या स्मरणार्थ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील अनंतकाका जोशी प्रतिष्ठानच्या सभागृहात सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत-खालापूरच्या 399व्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक विवेक दांडेकर आदी उपस्थित होते. व्यापारी सतीश पिंपरे यांनी आपले 61वे रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. नेहमी रक्तदान करणारे सुभाष तथा नाना ठकेकर आणि त्यांचे सुपुत्र श्रेयस आणि कन्या प्रांजली यांनी एकत्रित रक्तदान करून रक्तदान शिबिरात वेगळा विक्रम केला.