Breaking News

पर्यावरणाचे ठेकेदार!

संपूर्ण अभ्यासाअंती अचूक आराखड्यांनिशी पुढे जाणारा मेट्रो प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. अशा वेळी केवळ स्वार्थी राजकारणासाठी त्याला विरोध करणे हा खरा आंधळेपणा आहे. पर्यावरण आणि विकास ही हातात हात घालून चालणारी सख्खी भावंडे आहेत. या भावंडांच्या दरम्यान तेढ निर्माण करण्याने सवंग लोकप्रियता मिळेल, परंतु विकास मात्र कैक योजने दूर ढकलला जाईल.

पर्यावरण वाचवणे ही एक अमूल्य नैतिक जबाबदारी असली तरी दुर्दैवाने या कामात बख्खळ पैसा व अन्य हेतू साध्य करण्याचे मार्ग असल्याचे हेरून सध्या पर्यावरणाचे अनेक ठेकेदार निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. पर्यावरणाचे रक्षण हे अंतिमत: मानवाच्याच हिताचे आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. आणि ही समस्या फक्त भारतालाच भेडसावत नसून अवघ्या जगासमोरच हे आव्हान आहे. मुंबईतील आरे परिसरातील सुमारे 2700 झाडांच्या प्रस्तावित तोडीवरून सध्या जे वादळ उठले आहे, त्याला वास्तवत: अनेक पैलू आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरेतील भूखंड निश्चित करण्यात आला असून त्यासाठीच ही तोड प्रस्तावित आहे. खरे पाहता तिला सरसकट तोडही म्हणता येणार नाही. यातील महत्त्वाची व मोठी झाडे अन्यत्र पुनर्रोपित करण्याचे ठरले आहे. तसेच कारशेडकरिता तोडल्या जाणार्‍या झाडांच्या कैकपट अधिक झाडे लावण्याचाही निर्धारही मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासनाने आधीच जाहीर केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या दोन किंवा तीन वर्षांतच पर्यावरणाचे झालेले हे अल्पसे नुकसानही भरून निघालेले असेल असा निर्वाळा नामवंत पर्यावरण तज्ज्ञांनी दिलेला आहे. तथापि, झाडांच्या रक्षणासाठी आपण धावून जायलाच हवे अशा आग्रहानिशी काही उत्साही राजकारणी पुढे सरसावले आहेत. पर्यावरणाच्या बाजूने ओरड केली की प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चमकता येते आणि पर्यावरणवादी म्हणून मिरवता देखील येते. परंतु आपल्या आत्मकेंद्रित उबळीमुळे आपण पर्यावरणाचे आणि प्रकल्पाचेही नुकसान करत आहोत याचे भान संबंधितांना उरत नाही. कुठलेही बहरलेले झाड तुटणे ही क्लेशकारकच घटना आहे. वृक्षराजी ही मनुष्य जीवनाला पाठबळ देते. आरेतील वृक्षांची सरसकट कत्तल कुणाच्याच पचनी पडणार नाही आणि पडू नये. परंतु 2 कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या महामुंबईच्या विकासाचाही विचार तितक्याच पोटतिडिकेने व्हायला हवा. महामुंबईच्या भौगोलिक मर्यादा आणि नागरी यंत्रणांवर पडणारा असह्य ताण यामधून मार्ग काढण्यासाठी राज्यसरकारने महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प हाती घेतला. मेट्रोआधी विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी जंगले तुटली, डोंगर भुईसपाट झाले, पर्यावरणाचा प्रचंड र्‍हास वेगाने झाला. याची शेकडो उदाहरणे देता येतील. या सार्‍याचा फटका त्या-त्या भागातील लोकांना बसतोच आहे. सांगली, कोल्हापुरातील महापुराच्या जखमा अजुनही ओल्या आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या ढगफुटी व पावसानंतरही तिथल्या अनिर्बंध वाढीची चर्चा झाली होती. ही निश्चितच मानवनिर्मित संकटे असून आंधळा तथाकथित विकास हे त्याचे खरे कारण आहे हे मान्य करायलाच हवे. परंतु मेट्रो प्रकल्प हे आंधळ्या विकासाचे उदाहरण नाही. पर्यावरणाची संपूर्ण काळजी घेऊन नंतरच असले मोठाले प्रकल्प हाती घेता येतात. पर्यावरणविषयक जागतिक निर्बंध इतके कठोर आहेत की अशी काळजी घेतली नाही तर अशा प्रकल्पांना निधीच उपलब्ध होऊ शकत नाही.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply