Breaking News

पराभवाचा वनवास संपला; बंगळुरूचा तब्बल 6 सामन्यांनंतर पहिला विजय

मोहाली : वृत्तसंस्था

बंगळुरूने पंजाबचा 8 गडी राखून पराभव केला आहे. पंजाबने बंगळुरूला विजयासाठी 174 धावांचे आव्हान दिले होते. ते आव्हान बंगळुरूने 4 चेंडू शिल्लक ठेवून आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आहे. या विजयासोबतच बंगळुरूने यंदाच्या पर्वातील पहिला सामना जिंकला आहे. बंगळुरूकडून सर्वाधिक 67 धावा कॅप्टन विराट कोहलीने केल्या, तर एबी डीव्हीलियर्सने नाबाद 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. डीव्हीलियर्सला मार्कस स्टोनिसने चांगली साथ दिली. स्टोनिसने 28 धावांची उपयुक्त खेळी केली. बंगळुरूचे दोन गडी मोहम्मद शमी आणि आर. आश्विन यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

पंजाबने विजयासाठी दिलेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या बंगळुरूने फटकेबाजीने सुरुवात केली. पार्थिव पटेल आणि  विराट कोहली ही जोडी सलामीला आली. या दोघांमध्ये पहिल्या गड्यासाठी 43 धावांची भागी झाली. पार्थिव पटेल चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 19 धावांवर असताना झेलबाद झाला. त्याला आश्विनने बाद केले. यांनतर आलेल्या डीव्हीलियर्सच्या सोबतीने कॅप्टन कोहलीने टीमला स्थिरावलं. कोहली-डीव्हीलीयर्समध्ये दुसर्‍या गड्यासाठी 85 धावांची अर्धशतकी भागिदारी झाली. या दरम्यान विराट कोहलीने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. कोहलीला अर्धशतक केल्यानंतर जास्त वेळ खेळपट्टीवर राहता आले नाही. त्याने 53 चेंडूंमध्ये  67 धावांची खेळी केली. बंगळुरूच्या 128 धावा असताना विराट कोहली झेलबाद झाला. कोहलीचा बळी मोहम्मद शमीने घेतला. याआधी बंगळुरूने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने स्फोटक सुरुवात केली. ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या सलामीच्या जोडीने पंजाबला चांगली आणि वेगवान सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये 66 धावांची भागिदारी झाली. पंजाबने पहिला बळी लोकेश राहुलच्या रूपात गमावला. राहुल 18 धावा करून बाद झाला. यानंतर गेलची तडाखेदार खेळी आज सर्व क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाली. गेलने नाबाद 64 चेंडूंमध्ये 99 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 10 चौकार लगावले. गेलच्या 99 धावांच्या जोरावर पंजाबने 4 गडी गमावून 173 धावा केल्या. बंगळुरूकडून युझवेंद्र चहलने 2, तर मोहम्मद सिराज आणि मोईन अलीने 1-1 बळी घेतला.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply