Breaking News

सुपारीचे नुकसान, भात पिकावर करपा

कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून या सागरी किनार्‍याला लागून उंच अशा नारळी पोफळीच्या मोठ्याच मोठ्या बागा दिसून येतात. कोकणातील लोकांचे मुख्य पीक म्हणजे भातशेतीबरोबरच नारळ व सुपारी पिकावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. घराच्या शेजारी बागायात  जमीन व तिथे उंच अशा नारळ सुपारीच्या बागा अस्तित्वात आहेत. कडक

उन्हातसुद्धा या नारळ-सुपारीच्या घनदाट बागांमुळे वातावरणातील उष्णता कमी करण्यास मदत होत असते. मुरूड तालुक्यात भातशेतीचे क्षेत्र 3900 हेक्टर क्षेत्रात काढले जाते, परंतु यंदा मुरूड तालुक्यात 4300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने याचा मुख्य फटका  भात पिकांबरोबरच सुपारी या प्रमुख पिकाला सहन करावा लागला. गतवर्षी  मुरूड तालुक्यात 2600 मिलीमीटर एवढाच पाऊस बरसला  होता, परंतु यंदाचा पाऊस दुप्पट पडल्याने या प्रमुख पिकांना नुकसानीस सामोरे जावे  लागत आहे. या अतिवृष्टीमुळे सुपारी या प्रमुख पिकाला मोठा धोका पोहचल्याने येथील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.

मुरूड तालुक्यात अतिवृष्टीमुळे बागायती जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. 355  हेक्टर परिक्षेत्रात सुपारी पिकाची मोठी लागवड केली जाते. मुरूड तालुक्यात नांदगाव, आगरदांडा, मुरूड शहर, आंबोली, माजगाव, सर्वे, काशीद, बोर्ली, भोईघर आदी ठिकाणी सुपारी पिकाची मोठी लागवड केली जाते. सुपारी हे पीक वर्षातून एकदाच घेता येते, परंतु यंदा मुरूड तालुक्यात 4300पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने सुपारी पिकाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. अतिवृष्टीमुळे सुपारीच्या रोपाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले.त्याचप्रमाणे बुरशीची लागण झाल्याने यंदाचे सुपारीचे पीक थोडेच येणार हे गृहित पकडले जात आहे. मुरूड तालुक्यात बागायती जमिनी फार मोठ्या प्रमाणात असून प्रत्येकाच्या एक एकरपेक्षा जास्त सुपारी व नारळाच्या मोठ्या बागायती जमिनी आहेत. सुपारी ही मौल्यवान असून गुटखा, मसाला पान व विविध

खाद्यपदार्थांसाठी तिचा उपयोग केला जातो.तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतसुद्धा भारतातील सुपारीला विशेष दर्जा असून चांगली मागणीसुद्धा आहे.

 यंदा सर्वाधिक पाऊस पडल्याने सुपारीचे पीक कमी प्रमाणात येणार असल्याचे असंख्य बागायतदारांनी सांगितले. जास्त पाऊस हा सुपारीला अनुकूल नसतो. मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज या पिकासाठी योग्य मानली जाते. एकट्या मुरूड तालुक्यात सुपारी पिकाची साडेतीन कोटींची उलाढाल आहे. मुरूड तालुका सहकारी सुपारी खरेदी-विक्री संघामुळे सर्व सदस्यांना चांगला भाव मिळवून देण्याचे उत्तम काम या संस्थेद्वारे केले जाते, परंतु यंदा पावसाचे प्रमाण खूप वाढल्याने सुपारी पिकाला मोठी बाधा निर्माण झाली आहे. कोकणातील महत्त्वाचे असे सुपारीला सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने मोठा धोका निर्माण होऊन पिकाचे प्रमाण कमी होणार आहे. काही ठिकाणी बुरशीचा रोग, तर झाडावरची सर्व सुपारी खाली गळून पडली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून वर्षभरातून येणारे हे पीक अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. निसर्गाने अवकृपा केल्याने या अस्मानी संकटाला तोंड कसे द्यावे, हा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.

मुरूड तालुक्यातील सुपारीच्या पिकाला वर्षभरात खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी शेणखत व असणारी विविध फवारणीसुद्धा करावी लागते. रोपाचे उंच अशा झाडात रूपांतर झाल्यावर गर्द पिवळी अशी सुपारीची फळे तयार होतात, परंतु यंदा सततच्या पावसामुळे काही शेतकर्‍यांनी फवारणी केली होती, मात्र पाऊस पडल्याने सर्व असणारे लिक्विड धुवून जात होते. त्यामुळे फवारणी करणेसुद्धा जड जात  होते. बुरशीजन्य रोग झाल्याने झाडावरची सर्व सुपारी गळून जात असून सध्या झाडावर  कोणतेही फळ  दिसत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून शासनाकडे  मदतीचा हात मागत आहेत. प्रत्येक दिवसाला 160 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याने सुपारीच्या बुंद्याजवळ खूप पाणी साचून राहिल्याने बुरशीची लागण होण्यास मदत होत असते. पावसाचे प्रमाण सतत राहिल्याने  कोणतीही उपाययोजना करणे कठीण  बनल्याचे असंख्य शेतकर्‍यांनी सांगितले. विदर्भाप्रमाणे शासनाने कोकणावरसुद्धा लक्ष देऊन सुपारी पिकाला झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी असंख्य शेतकरी मागणी करताना

दिसत आहेत.

याबाबत नांदगाव येथील बागायतदार सचिन पाटील यांनी सांगितले की, एकतर देशात जागतिक मंदी सुरू आहे. त्यातच वर्षातून येणार्‍या आमच्या सुपारीच्या पिकाला अतिवृष्टी झाल्याने झाडावरून असंख्य सुपार्‍या खाली गळून पडल्या आहेत, तर काहींना रोग आल्याने यंदा सुपारीचे पीक फार कमी झाले  आहे. सुपारीच्या लागवडीसाठी मोठा खर्च होतो, परंतु पीक कमी आल्याने झालेला खर्चसुद्धा सुटणार नाही. त्यामुळे बेकारीची मोठी समस्या उद्भणार असून, शासनाने यंदा तरी बागायत जमीनदारांकडे लक्ष देऊन मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे.

   करपा रोगामुळे भातपीक खूप कमी प्रमाणात येते. सदरील या रोगाची लागण शीघ्रे ते आंबोली परिसरात दिसून आली आहे. याबाबत कृषी खाते सजग झाले असून, मुरूड तालुक्यातील अनेक भागांत पिकांची पाहणी करण्यात मग्न झाले आहे. पाऊस जोरदार पडला, परंतु अतिपावसामुळे या रोगाची लागण झाल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात येत आहे.त्याचप्रमाणे मुरूड तालुक्यात करपा रोगामुळे स्थानिक शेतकरीसुद्धा हवालदिल झाले आहेत.

करपा रोगाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गावातील शेतकरी हा अगोदरच गरीब असतो. भाताची शेती करण्यासाठी इतरांकडून कर्ज काढून शेती करीत असतो. त्यातच करपा रोगाने डोके वर काढल्यामुळे शेतकर्‍यांचे कसे होणार, हा प्रमुख प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. समजा एखाद्या शेतकर्‍यास एका शेतातून 50 मण भात मिळत असेल, तर याच शेताला करपा रोगाची लागण झाल्यास हेच उत्पादन 25 मण म्हणजेच अर्ध्यावर येणार आहे.करपा रोगाचा जोराचा प्रादुर्भाव होण्याअगोदर तातडीने कृषी खात्याने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.   

करपा रोगाबाबत मुरूड तालुक्याचे कृषी अधिकारी सुरज नामदास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, शिघरे ते आंबोली भागात हा रोग आल्याची माहिती मिळत असून, त्वरित या भागाचा दौरा करून जर करपा रोग असेल तर द्रव मिश्रण रसायन फवारणीची उपाययोजना तातडीने करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कृषी सहाय्यकांना पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे सुपारी या प्रमुख पिकावर अतिवृष्टीमुळे बुरशीजन्य रोगाची लागण होऊन झाडावरील सुपारी खाली पडत आहे. याबाबतसुद्धा आम्ही काळजी घेतली आहे. मुरूड तालुक्यातील सर्व सुपारीच्या झाडांची पाहणी सुरू असून, तातडीची उपाययोजना आखली जात असल्याचेही या वेळी नामदास यांनी सांगितले.

-संजय करडे

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply