Breaking News

म्हसळ्यातील तीन गावठाणे गायब

महसुली लेखांत प्रचंड तफावत

म्हसळा : प्रातिनिधी

म्हसळा शहरातील तब्बल तीन गावठाणांबाबत महसुली अभिलेख व भूमी अभिलेख यामध्ये तफावत असल्याचे पुढे आले आहे. शहरात सात गावठणे असल्याचे महसुली लेखे उपलब्ध आहेत. तर तालुका भूमी अभिलेख खात्याच्या रेकॉर्डप्रमाणे  शहरात केवळ चार गावठाणांची नोंद आहे. त्यामुळे तीन गावठाणांचे महसुली लेख भूमी अभिलेख विभागात जाईपर्यंत गायब झाल्याचे स्पष्ट होत आहे. म्हसळा गावठाण नं. 1मध्ये 517 प्रॉपर्टी, गा. नं 2मध्ये 19 प्रॉपर्टी, गा. नं 3मध्ये 40 प्रॉपर्टी आणि गावठाण नं 4मध्ये 20 प्रॉपर्टी असल्याबाबत महसुल व भूमी अभिलेख विभाग यांचे एकमत आहे. मात्र गावठाण नं 5 क्षेत्र 1.46.1 प्रापर्टी हिस्से 41 (कन्याशाळा शंकर मंदिर गोडाऊन परिसर), गावठण नं 6 क्षेत्र 1.28.5 प्रापर्टी हिस्से 25 (गौळवाडी परिसर) आणि गावठण नं 7 क्षेत्र 69.1 प्रापर्टी हिस्से 30 (बौद्धवाडी परिसर) या तीन गावठणाची तालुका व जिल्हा भूमी अभिलेख विभागात नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. तालुका महसुल विभागाने या त्रुटी नजरेस आणून देवूनसुध्दा मागील 20वर्षापासून भूमी अभिलेख विभागाकडून योग्य ती दखल का घेतली जात नाही, हा गंभीर विषय बनला आहे. वास्तविक महाराष्ट्र जमीन महसूल लेखे (महसूल आधिकार्‍यांची कार्यपद्धती) नियम1966 आणि त्याखाली केलेल्या नियमांप्रमाणे महसुली लेखे सुस्थितीत ठेवणे तलाठी व मंडळ अधिकार्‍यांच्या कर्तव्याचा भाग आहे, तरीसुध्दा त्या तीन गावठाणांच्या नोंदीकडे दुर्लक्ष का झाले, हे अद्यापही अनुत्तरीत आहे.

महसुल विभागाकडून म्हसळा शहरांत 1ते 7 गावठाणे असल्याचे आम्हाला 7/12 मिळतात, आम्ही टीएलआरकडे मोजणी प्रस्ताव दिलेला आहे.

-जयश्री कापरे, नगराध्यक्ष, नगरपंचायत म्हसळा

आमच्या आकारबंदानुसार म्हसळा शहरात गावठाण क्रमांक 1ते 4 दाखवत आहेत. गावठाण क्रमांक 5 (कन्या शाळा परिसर), 6 (गौळवाडी) आणि 7 (बौद्धवाडी) साठी गावठाण विस्तार प्रस्ताव करता येईल.

-महेंद्र मोहिते, उपअधिक्षक, भूमी अभिलेख, म्हसळा

आमच्याकडे असलेले गावठाण क्रमांक 5, 6 आणि 7 चे महसुल लेखे फेरफार तपासून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

-शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply