ब्रिटिशांनी वसविलेल्या माथ्यावरील रान म्हणजे माथेरान. या पर्यटनस्थळी येण्याचे हक्काचे माध्यम बंद पडले आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन आणि माथेरान-अमन लॉज शटल सेवा बंद पडली आहे. मिनीट्रेन नाही तर पर्यटन नाही, अशी धारणा असलेल्या माथेरानकरांनी जोरदार आंदोलन छेडले. त्याचाच एक भाग म्हणून 14 ऑक्टोबरला नेरळ येथे मध्य रेल्वेची मेन
लाइनवरील वाहतूक खंडित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता, परंतु हे रेल रोको आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, मात्र मध्य रेल्वेकडून मिनीट्रेनबाबत सकारात्मक घोषणा न झाल्यास 21 ऑक्टोबरला होणार्या राज्य विधानसभा निवडणुकीवर माथेरानकर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहेत.
1907मध्ये नेरळ येथून माथेरानला जाणारी मिनीट्रेन सुरू झाली. प्रामुख्याने ब्रिटिश राजवटीने आपल्या सुखवस्तू जीवनासाठी माथेरान शोधून काढले होते आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी मिनीट्रेन हा एकमेव पर्याय वाहतुकीच्या रूपाने उपलब्ध होता. 1970च्या दशकात रेल्वेचा संप झाला आणि माथेरानमध्ये राहणारे तसेच धनाढ्य पारशी लोक यांचे येणे-जाणे बंद झाले. ते गावाला भूतकाळात नेणारे होते, हे लक्षात घेऊन माथेरानकरांनी श्रमदान करून दस्तुरी नाका ते नेरळ असा रस्ता तयार केला. सध्या हा रस्ता दोन गाड्यांची वाहतूक करणारा प्रशस्त रस्ता राज्य सरकारच्या माध्यमातून बनला आहे, पण माथेरान हे वाहनांना 100 टक्के बंदी असलेले गाव आणि पर्यटनस्थळ जगाच्या पाठीवर एकमेव असल्याने माथेरानला पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे निसर्गाच्या सान्निध्यात यायला कधीही तयार असतात. अशा या माथेरानमध्ये येण्यासाठी मिनीट्रेन हा पर्याय सर्वांच्या आवडीचा असल्याने मिनीट्रेन सुरू तर पर्यटन हंगाम बहरलेला आणि मिनीट्रेन बंद तर माथेरानमधील व्यवसाय ठप्प अशी स्थिती निर्माण होत असते. मिनीट्रेनसाठी माथेरान आणि नेरळ स्थानकात प्रवासी पर्यटक तासान्तास थांबून राहायचे. त्यात पर्यटकांची मागणी बघून मध्य रेल्वेने अमन लॉज-माथेरान अशी शटल सेवा सुरू केली आणि पर्यटकांना नेरळपासून प्रवास करता आला नाही तर अमन लॉजपासून सुविधा देण्यात आली.
मात्र जोरदार पावसामुळे मिनीट्रेन बंद झाली आणि माथेरानचे पर्यटन कमी झाले. परिणामी माथेरानकरांचे जीवनमान चिंतामय झाले. यासाठी माथेरानकरांनी मध्य रेल्वेचे डीआरएम संजीवकुमार जैन यांची भेट घेऊन ही मिनीट्रेन दिवाळी पर्यटन हंगामाअगोदर सुरू करावी याबाबत डीआरएम यांच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी अभियंत्यांची टीम पाहणीसाठी पाठवली, पण त्यांच्याकडून काही अपेक्षित घडलेच नाही. दुसर्या वेळेला स्टेशनची पाहणी करून लोको शेडची जागा निश्चित करण्यासाठी येऊन माथेरानकरांकडे मदतीचा हात मागितला. त्याला येथील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दाखवला व 9 ऑक्टोबरला लोको शेड करण्यासाठी वाहनतळाशेजारील जमीन निश्चित करून आखणी केली. या तिन्ही वेळेस काम कधी पूर्ण होणार, असे विचारले असता अधिकारी काढता पाय घेत आहेत. एकीकडे आम्ही काम करतो असे दाखवतात व दुसरीकडे कामचुकारपणा करतात. या दुटप्पी धोरणामुळे अधिकार्यांवरील विश्वास उडाल्यामुळे माथेरानकरांनी करो या मरोची भूमिका घेतली होती.
जून 2019मध्ये नेरळ-माथेरान-नेरळ प्रवासी सेवा बंद झाली आणि यावर्षीच्या विक्रमी पावसात माथेरान-अमन लॉज ही शटल सेवा जुलै महिन्यापासून बंद पडली. मिनीट्रेनच्या 21 किलोमीटर नॅरोगेज मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन नॅरोगेजचा मार्ग वाहून गेला आहे. यामुळे मिनीट्रेनची शटलसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दिवसापासून माथेरानमधील पर्यटक थांबले असून अनेक दिवशी तर गावातील लाल मातीच्या रस्त्यावरून ग्रामस्थ वगळता अन्य कोणाचेही पाय लागले नाहीत. या स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत मिनीट्रेनची सेवा सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांना एकत्र केले. मध्य रेल्वेच्या अधिकार्यांना निवेदने देण्यात आली, मात्र ठोस आश्वासन मिळत नसल्याने माथेरानकर आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले. गतवर्षीचा अनुभव गाठीशी असलेल्या माथेरानकरांनी मग नेरळ येथे मध्य रेल्वेची मुंबई-पुणे मेन लाइन रोखण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी पुन्हा मध्य रेल्वेकडे माथेरानकर जाऊन पोहचले होते, परंतु ग्रामस्थ आंदोलनासाठी आक्रमक असल्याने 14 ऑक्टोबर रोजी माथेरान गाव बंद करून सर्व नेरळ येथे मध्य रेल्वेची वाहतूक अडविण्यासाठी हजारोंच्या संख्येने येणार होते. माथेरानकरांच्या या लढ्याला सर्व थरातून पाठिंबा मिळाला.
दिवाळीपासून माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होतो आणि त्या वेळी मिनीट्रेन बंद आहे. ही बाब माथेरान आणि मिनीट्रेन असे समीकरण बनलेल्या माथेरानसाठी आणि येथील पर्यटनासाठी निश्चितच धोकादायक आहे. हे ओळखून आरपारची लढाई करण्यासाठी माथेरानकर सज्ज झाले होते. मिनीट्रेनची शटल सेवा पहिल्या टप्प्यात सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे सकारात्मक नाही असे दिसून आल्यास मात्र 21 ऑक्टोबर रोजी होणार्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला जाणार आहे. त्यासाठी माथेरानमधील सर्व राजकीय पक्ष सहमत असून मिनीट्रेनच्या ट्रॅकचे झालेले नुकसान हे अगणित असून किमान शटल सेवा सुरू करून पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष निवडणूक काळात मतदानावर बहिष्कार टाकण्यावर एकमत दाखवत आहेत. माथेरानमधील राजकीय पक्षांनी आवाहन केल्यानंतर शहरातील सर्व समाज संघटना, अन्य संघटना यांनी रेल रोको आंदोलनास पाठिंबा दिला होता.
माथेरान ते अमन लॉज ही शटल सेवा बंद असून शटल सेवा तत्काळ सुरू करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन
माथेरानमधील श्रीराम चौकात करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या बैठकीला सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. रेल्वे प्रशासन शटल सेवेसाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याने पुन्हा एकदा रेल रोको आंदोलन करावे लागेल, असा निर्धार अजय सावंत यांनी व्यक्त केला होता. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, 2017मध्ये रेल रोकोचा इशारा दिल्यावरच शटल सेवा सुरू झाली होती. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेवक प्रसाद सावंत यांनी शटल सेवा सुरू राहावी यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
मात्र रेल्वेचे अधिकारी केवळ आश्वासने देत जनतेची दिशाभूल करीत असल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीवर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. निधीअभावी लोको शेडचे काम सुरू होत नसल्याचे काही गावकर्यांनी निदर्शनास आणून दिल्याने मनोज खेडकर यांनी याबाबत रेल्वेचे अधिकारी आपली दिशाभूल करीत असल्याचे सांगितले. खेडकर यांनी 2016मध्ये एमएमआरडीएकडून रेल्वे शटल सेवेसाठी 10 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. यापैकी पाच कोटी 88 लाख रुपये रेल्वेला देण्यात आले होते. त्यातील केवळ तीन लाख रुपये रेल्वेने खर्च केले आहेत. बाकीचा पाच कोटी 85 लाखांचा निधी मध्य रेल्वेकडे पडून आहे. यातून या शटल सेवेसाठी निधीची कोणतीच कमतरता नसल्याचे स्पष्ट होते.
सध्या निवडणुकीचे वातावरण सर्वत्र तापले असून नेहमीप्रमाणे माथेरानमधील मतदारांची संख्या लक्षात घेता प्रमुख उमेदवार फिरकले नाहीत. यापूर्वीच्या अनेक निवडणुका पाहता माथेरानमधून कोणत्याही राजकीय पक्षाचे निवडणूक रिंगणात असलेले प्रमुख उमेदवार प्रचारासाठी पोहचत नाहीत. ही बाबदेखील या वेळी घडणार की निवडणूक लढवत असलेले प्रमुख उमेदवार माथेरानमधील मतदारांच्या गाठीभेटी घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
-संतोष पेरणे