Breaking News

टीम इंडियाला धक्का

दुखापतीमुळे के. एल. राहुल संघाबाहेर

सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के. एल. राहुलला दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे राहुल उर्वरित मालिकेला मुकणार आहे. सराव करीत असताना त्याला दुखापत झाली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निवेदन प्रसिद्ध करीत के. एल. राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली आहे. शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करीत असताना राहुलच्या मनगटाला दुखापत झाली आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या राहुलला दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध नसेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
राहुल लवकरच भारतात परतणार असून, बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपस्थित राहणार असल्याचेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. राहुलची भारतीय संघातील अनुपस्थिती भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. याआधीच मोहम्मद शमी आणि उमेश यादव दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या भारतीय संघात इशांत शर्मालादेखील सहभागी होऊ शकला नाही.
सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरू होणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यामध्ये एकीकडे रोहित शर्माची उपस्थित भारतीय संघासाठी मोठी जमेची बाजू असताना के. एल. राहुलची दुखापत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मोठा धक्का असू शकतो. हनुमा विहारीने तीन डावांमध्ये फक्त 45 धावा केल्या असल्याने राहुल कमबॅक करीत भारतीय संघाची फलंदाजी मजबूत करेल अशी आशा होती, मात्र दुखापतीमुळे राहुल संघाबाहेर झाला आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकत बरोबरी केली आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply