अनंत गीते यांचा सुनील तटकरेंना टोला

रोहे ः प्रतिनिधी
आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सरकारकडून निधी आणणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे. कोकणासाठी आम्ही 18 हजार कोटींची कामे आणली, तर तटकरे 300 कोटींच्या कामांचे तुणतुणे वाजवत असून, ते किरकोळ कामांची दवंडी पिटत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रोहे येथे शनिवारी केला. श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी शनिवारी रोह्यातील ओसवाल भवन येथे आयोजित केलेल्या सभेत अनंत गीते बोलत होेते. शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, सुरेश मगर, संतोष खटावकर, अॅड. मनोजकुमार शिंदे, शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, भाजप शहर अध्यक्ष शैलेश रावकर, नगरसेविक समिक्षा बामणे, अनित शेडगे, अॅड. दीपक पडवळ, आनंद काळे, नीता हजारे, मेघना ओक, धनश्री बापट, सीमा कोनकर, उस्मान रोहेकर, सचिन फुलारे आदी मान्यवर उपस्थित होते. रोह्यातील व्यापारी बंधूंचा पाठिंबा आम्हाला आहे. त्यामुळे विनोद घोसाळकर यांना रोहा शहरातून प्रचंड मते मिळतील, असा विश्वास शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी या वेळी व्यक्त केला. देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे काम चांगले सुरू आहे, असे सांगून बार आसोसिएशन अध्यक्ष अॅड. नाना देशमुख यांनी तटकरे यांनी रोह्यातील संजय गांधी हॉस्पिटलसाठी काय केले, असा सवाल केला. पालकमंत्री म्हणून काम करीत असताना सुनील तटकरे यांनी कोणता विकास केला, असा प्रश्न उपस्थित करून सुरेश मगर यांनी तटकरे यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा विकास केला, असा आरोप केला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विनोद घोसाळकरच निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या सभेला व्यापारी, वकील, पत्रकार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.