Breaking News

विरोधक हताश आणि निराश : पंतप्रधान मोदी

परळी : प्रतिनिधी

विरोधी पक्ष निराश लोकांनी भरलेले आहेत. त्यांना त्यांचे नेते सोडून जात आहेत, तर जे उरले आहेत ते हताश झाले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 17) विरोधकांना टोला लगावला. राज्याच्या

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी येथील सभेत ते बोलत होते. मराठवाडा दुष्काळमुक्त करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. 

सभेपूर्वी पंतप्रधान मोदींनी वैजनाथ येथे जाऊन बाबा वैजनाथ यांचे दर्शन घेतले. जय शिवशंभो, वैजनाथाच्या पावन भूमीत आणि माझे मित्र गोपीनाथांच्या कर्मभूमीत मी आज आलो आहे. संतभूमी असलेल्या मराठवाड्यातील जनतेला माझा नमस्कार, असे म्हणत त्यांनी मराठी भाषणाला सुरुवात केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या देशावर महादेवाची कृपा आहे. सोमनाथापासून वैजनाथापर्यंत मला आशीर्वाद मिळाला आहे. तुम्ही मला गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासारखे मित्र दिलेत. आपण कायम कमळाला मतदान केले आहे. यंदा मागील सर्व विक्रम मोडीत निघतील अशी परिस्थिती आहे. ही गर्दी पाहून काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय होत असेल. भाजपकडे असे लाखो कार्यकर्ते आहेत जे पक्षासाठी जीव ओतून काम करतात, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते त्यांना सोडून जात आहेत. युवा आणि ज्येष्ठ मंडळी सोडून जात आहेत आणि जे राहिलेत ते हताश आहेत.

पाच वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे राज्यात महायुतीचे वातावरण आहे. आमची कार्यशक्ती व विरोधकांची स्वार्थशक्ती अशी लढाई आहे. यापूर्वी चोरी होणारे योजनांचे पैसे आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळ हे मोठे संकट आहे. नदीजोड प्रकल्पातून दुष्काळ हटविण्यात येईल.

भाजपने जेव्हा जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले, तेव्हा काँग्रेससह सर्वांनी विरोध केला. ही लोकशाहीची हत्या असल्याची भाषा वापरली. विरोधकांच्या या कर्माची शिक्षा देश त्यांना देईल, पण पहिली संधी महाराष्ट्राला मिळाली असून ती सोडू नका. माझा तुमच्या देशभक्तीवर विश्वास आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

21 ऑक्टोबरला सोमवार आहे. मतदानाचा वार आहे, पण हा दिवस रविवारला जोडून येतोय. त्यामुळे सुटी साजरी करू नका. हा लोकशाहीचा उत्सव आहे. दिवाळीप्रमाणे हा उत्सव साजरा करा. घराघरांतून वाजतगाजत मत देण्यासाठी बाहेर पडा. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

सरकारच्या माध्यमातून

कोट्यवधींची कामे : पंकजा मुंडे

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, मोदीजी प्रचारासाठी परळीत आल्याने अत्यंत आनंद होत आहे. 1998मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथे आले होते. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे झाली. मोदीजींमुळे बीड जिल्ह्यात रेल्वे आली. आता खुद्द ते आल्याने येथील दुष्काळ दूर होईल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply