Breaking News

रोह्यातील जि.प.च्या 50 शाळांची पडझड; 68 वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

रोहे : प्रतिनिधी

चक्रीवादळात रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या 50 शाळांमधील 77 वर्गखोल्यांची पडझड झाली आहे. सध्या कोरोना संसर्ग नसलेल्या गावांतील शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत, मात्र वर्गखोल्या नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे असा प्रश्न तालुक्यातील शिक्षकांना पडला आहे. रोहा तालुक्यात जि. प.च्या 237 शाळा आहेत. त्यातील शुन्य पट असल्याने तीन शाळा बंद करण्यात आल्या. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून जि. प.च्या सर्व शाळा बंद आहेत. दरम्यान, निसर्ग आणि तौत्के चक्रीवादळात तालुक्यात जि. प.च्या 50 शाळांच्या 77 वर्गखोल्यांची पडझड झाली. त्यातील 48 वर्गखोल्यांचे पूर्णत: तर 29 वर्गखोल्यांचे अंशत: नुकसान झाले आहे. त्यापैकी पाटणसई, चांडगाव, अमडोशी, पुगाव, वावेपोटगे, यशवंतखार, उडवणे येथील शाळांच्या एकूण सात वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव विविध माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत, तर 68 वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्ग नसलेल्या गावातील शाळा सुरु करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, मात्र रोहा तालुक्यात 50 शाळांमधील वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कुठे बसवायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. तालुक्यातील कातळवाडी, मुळवाडी, एकलघर, चिकणी आदिवासीवाडी, भातसई, वरवडे, काळकाई, करंजेवाडी, मुटके, घोसाळे बौद्धवाडी, कोलाड, गोवे, खातेलेवाडी, विरजोली, पुई आदिवासीवाडी, मुठवली बुद्रुक, सुडकोली उर्दू, करंजवीरा येथील प्राथमिक शाळांच्या प्रत्येकी एका वर्गखोलींची पडझड झाली आहे. तर पिंपळवाडी, चिकणी, वणी, विष्णुनगर, महादेव वाडी (वाशी), चिंचवली, कुडली (पाथशेत), ताम्हणशेत आदिवासीवाडी, हाळ, खारगांव, बाबेडघर, व्हावे (मराठी), टिटवी, तळवली, डोलवहाळ, धानकान्हे, धानकान्हे आदिवासीवाडी, खांब, मालसई, डोंगरचीवाडी, पिंगळसई येथील शाळांच्या प्रत्येकी दोन आणि वाली येथील प्राथमिक शाळेच्या चार वर्गखोल्यांचे चक्रीवादळात नुकसान झाले आहे. याशिवाय सुतारवाडी, शेणवई व दिव येथील शाळांच्या शौचालयांचे छप्पर उडाले आहे.

निसर्ग आणि तौत्के चक्रीवादळात रोहा तालुक्यातील अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. या शाळांचे दुरुस्तीचे प्रस्ताव आल्यानंतर ते मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले आहेत.

-सादुराम बांगारे, गटशिक्षणाधिकारी, पं. स., रोहा

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply