आवक घटल्याने पुन्हा साठीपार
नवी मुंबई : प्रतिनिधी
कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी करूनसुद्धा मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरांत कांद्याच्या दरांनी साठी पार केली आहे. आवक कमी असल्याने कांद्याच्या दरात आठवडाभरात घाऊक आणि किरकोळ बाजारात किलोमागे 10 रुपयांची वाढ झाली असून, रोजच्या आहारातील इतरही भाज्या 60 ते 80 रुपयांच्या घरात असल्याने सामान्य माणसाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
सप्टेंबर महिन्यात राज्यभरात झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत कांदा साठवण चाळींमध्ये पाणी शिरल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने कांद्याचे भाव वधारले होते.
आठवडाभरात कांद्याच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात 10 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 32 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 42 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात 50 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कांदा 60 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा जुन्नर, आंबेगाव आणि लासलगाव येथून येतो. वाशीतील कांदा-बटाटा विभागातून संपूर्ण मुंबई शहराला कांदा आणि बटाट्याचा पुरवठा केला जातो. पावसाळ्यापूर्वी वाशीत येणार्या कांद्याच्या 100 गाड्यांची आवक आता 70 ते 75 गाड्यांवर येऊन ठेपली आहे. आवक कमी असल्याने परदेशातून कांदा आयात करावा लागत आहे. ‘राज्यातील कांद्याचे नुकसान झाल्याने इजिप्तवरून कांद्याची आयात करावी लागत आहे. इजिप्तवरून आयात केलेल्या कांद्याचा माल खराब आल्याने त्याला बाजारात उठाव नाही. सध्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये नवीन कांद्याचे पीक बाजारात आल्यावर कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता’ असल्याचे कांदा-बटाटा विभागाचे उपसचिव कृष्णकांत पवार यांनी सांगितले.
मागील वर्षी एपीएमसी बाजारात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांत 100 गाड्यांपैकी 30-40 गाड्या नवीन कांदा दाखल झाला होता; परंतु यंदा आवकीत घट झाली असून, आता बाजारात 60 पैकी केवळ 10 गाड्या नवीन कांदा, तर 40-50 गाड्या जुना कांदा दाखल झाला आहे. भिजलेला ओला कांदा दाखल होत असल्याने एक ते दीड दिवस टिकत आहे. त्यामुळे ग्राहक जुन्याच कांद्याला पसंती देत असून, दरात वाढ होत आहे.