महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगड परिसरातील गावात बिबट्याची असलेली दहशत कायम असून, दोन दिवसांपूर्वी चरावयास गेलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. या भयानक हल्ल्यात तीन जनावरे ठार झाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी परिसरातील एका वाडीवरील जनावरांवर सोमवारी बिबट्याने हल्ला केला. त्यात दोन शेतकर्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रायगडवाडी गावातील बाबू भागोजी औकीरकर यांची एक गाय आणि वासरू, तर सुनील कोकरे यांची एक गाय यामध्ये ठार झाली आहे. याबाबत पंचनामा करून शेतकर्यास मदत मिळवून देण्याकरिता प्रस्ताव तयार केला असल्याचे वन विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे यांनी सांगितले.
किल्ले रायगड परिसरात गेल्या काही वर्षांत बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या सुमारे दहाहून अधिक घटना घडल्या आहेत. ऐन पावसाळ्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना थांबल्या होत्या, मात्र आता पुन्हा हा हल्ला झाल्याने बिबट्याची दहशत कायम असल्याचे यामुळे समोर आले आहे.