भाऊबीज म्हणजे दिवाळीतील एक अतूट नात्याचा दिवस… भावाबहिणीचं नातं दृढ करणारा प्रेम वाढवणारा सण. माझा एक मित्र गावाला घरी सण साजरा करण्यासाठी गेला होता. सकाळी भाऊबीज आटोपून त्याने पुण्याला निघण्याचा निर्णय घेतला. सणासुदीचे दिवस त्यामुळश एसटीला गर्दी होती. घरचे आरक्षण करून जा म्हणत होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून हा निघाला. प्रवासाच्या बॅग, फराळाचा डबा आणि नेहमीप्रमाणे घेऊन जायचा भाजीपाला साहजिकच ओझं असणारं होतं, पण हो नाही करत आरक्षण काय शेवटी केलं नाही आणि मिळेल त्या एसटीने पुणे गाठायचं असं ठरवलं. कोल्हापूर स्टँडवर आल्यावर धावपळ चालू झाली. एसटी बघून जागा पकडण्याची अर्ध्या तासाच्या पाठशिवणीच्या खेळानंतर एसटी महामंडळच्या कृपेने जादा सोडण्यात आलेल्या गाडीत जागा मिळाली…
कंडक्टर दादा जरा शांत स्वभावाचेच वाटले. बसायला व्यवस्थित जागा मिळाल्यामुळे तो खणश होऊन निवांत बसला आणि प्रवास सुरू झाला. बस एशियाड होती त्यामुळं तिकीट दर जास्त होता. त्यावरून एका काकूंनी कटकट करून शेवटी उतरल्या बुवा त्या. कंडक्टरदादा हसून म्हटले ज्याचा त्याचा प्रश्न तिकीट दर मोठ्याने सांगून अजून कोणी उतरणार का असे त्यांनी विचारल्यावर आणखी 4, 5 प्रवासी उतरले. झालं मग मागच्या सीट रिकाम्या राहिल्या आणि त्या रिकाम्या जागा भरायला बस मधेमधे स्टॉप घेत जाणार हे समीकरण सगळ्या प्रवाशांच्या डोक्यात तयार झालं होतं, जादा गाडी आणि सीट रिकाम्या ठेवणं हे कंडक्टर आणि ड्राइव्हर यांच्या दृष्टीने थोडं धास्तीच होतं. शेवटी नोकरी आहे ती आणि त्यासाठी कष्ट हे तर करावे लागणारच. नॉनस्टॉप म्हणून कोल्हापूर एसटी स्टॅन्डवरून सुटलेली बस स्टॉप घेत पुण्याच्या दिशेने निघाली थांबणार्या प्रत्येक स्टॉवर प्रवासी काही मिळत नव्हते. कंडक्टरच्या चेहर्यावर त्याचा तणाव साफ दिसून येत होता, पण त्यांनी प्रयत्न काय सोडले नाहीत. नोकरीशी प्रामाणिक असल्याने त्यांचे ते कष्ट दिसून येत होते. बस पुढे प्रवास करत जेवणासाठी थांबली. जेवणाची 20 मिनिट घेऊन अंतिम टप्प्याचा प्रवास सुरू झाला. तसं थोड्या वेळाने बस पुन्हा थांबली. भोर फाट्याच्या पुढे.. थोडा वेळ कोणालाच काही कळलं नाही बस कशासाठी थांबली ते. इतक्यात कंडक्टर केबिनमधून बाहेर आले आणि माझ्या मित्राकडे बघून म्हणाले, आमच्या बहिणाबाई आल्यात फराळाचा डबा घेऊन. ते सांगतानाचा आनंद त्याचा रिकाम्या सिटचा तणाव कधीच दूर करून गेल्याचे दिसत होते.
खूप छान वाटलं सगळ्यांना त्यांची बहीण आवर्जून त्यांना भेटायला आली होती. शेवटी रक्ताचं नातं आणि भाऊबीजसारखा दिवस, ऑनड्युटी असल्यामुळे कंडक्टर दादांना भाऊबीजेला तिच्याकडे जाता येणार नव्हते. म्हणून कोल्हापुरातून निघताना त्यांनी बहिणीला फोन केला होता, तर ही त्यांची ताई चक्क ओवाळणीचं ताट घेऊनच स्टॉपवर आली होती. तो सुखद धक्का सर्व प्रवाशांना सुखावून गेला. जशी त्यांची ताई ओवाळणी ताटासह बसमध्ये आली तसं या दोघा भावाबहिणींच्या मनातले भाव सर्व काही सांगून गेले. माझ्या मित्राने सीटवर कंडक्टर दादांना जागा दिली आणि त्यांच्या बहिणीने त्यांच औक्षण केलं… तो 10 मिनिटांचा क्षण सर्वांना भारावून गेला. यालाच भावाबहिणीचं प्रेम म्हणतात. हे सांगावं लागूच नये. बसमधल्या सर्व प्रवाशांनी तो सुखद क्षण अनुभवला. त्या वेळी प्रत्येक प्रवाशाच्या मनात एका कोपर्यात वाईटही वाटलं. एसटी कर्मचारी, पोलीस आणि सीमेवर रक्षण करणारे सैनिक यांनाही सण असतात, त्यांनाही नाती असतात, पण कर्तव्यापुढे सारं काही फिक पडतं, पण असंही नातं जपलं जातं आणि त्या प्रेमाची सीमा कुठंच नाही… शेवटी जाता जाता बहिणीचा निरोप घेताना कंडक्टरदादांनी मारलेल्या मिठीत आजची भाऊबीज न्हावून निघाली असंच वाटलं. तो क्षण, तो दिवस ती भाऊबीज अविस्मरणीय करून गेली, हे मात्र खरे!
-नितीन देशमुख, फेरफटका