मुंबई ः प्रतिनिधी
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाचा रविवारी (दि. 18) 25वा वाढदिवस. 18 जुलै 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या स्मृतीने कमी वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव चमकवले आहे. तिच्यावर रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षावर झाला. भाऊ आणि वडिलांना पाहून क्रिकेट खेळण्यास शिकलेल्या स्मृतीने लहान वयातच क्रिकेटमध्ये करिअर करायचे ठरवले आणि या सांगलीकर खेळाडूने नवव्या वर्षीच राज्याच्या अंडर-15 संघात जागा मिळवली होती. स्मृतीचा चेहरा पाहून कुणी म्हणणार नाही की ती मैदानात गोलंदाजांची धुलाई करीत असेल. स्मृतीने आतापर्यंत 59 एकदिवसीय सामन्यात 42च्या सरासरीने 2253 धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. भारताकडून सर्वाधिक धावा काढणार्या महिला खेळाडूंमध्ये ती टॉप-5मध्ये आहे. त्याचबरोबर टी-20मध्येही तिने 26च्या सरासरीने 81 सामन्यांत 1901 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतके आहेत. स्मृतीने आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये दोन अर्धशतकेही आहेत. स्मृती सध्या भारतीय टी-20 संघाची उपकर्णधार आहे.