नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
उद्योजकांना आवाहन करताना भारतात गुंतवणुकीसाठी हीच
सर्वोत्तम वेळ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. बँकॉक येथे आयोजित आदित्य बिर्ला समूहाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. मोदी तीन दिवसांच्या थायलंड दौर्यावर आहेत. मोदी आपल्या दौर्यादरम्यान असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान), पूर्व आशिया आणि प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देताना मोदी म्हणाले, भारतात गुंतवणुकीची हीच सर्वोत्तम वेळ आहे. गुंतवणुकीसाठी भारत सध्या जगात सर्वाधिक आकर्षक अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. भारतात व्यापार करणे आधीपेक्षा सोपे आणि सुलभ झाले आहे. भारत सध्या स्थित्यंतराच्या काळातून जातोय. देशाने पारंपरिक नोकरशाही शैलीत काम करणे थांबवले आहे. व्यवसायाच्या बाबतीत आता भारताकडे अनेक संधी आणि सुविधा आहेत. भाजप सरकारने 2011मध्ये पदभार स्वीकारला तेव्हा भारताचा जीडीपी दोन ट्रिलियन डॉलर्स होता, मात्र आता भारताचे पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य असल्याचे सांगून करक्षेत्रात आम्ही महत्त्वाचे काम केले असून भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.