Breaking News

रिक्षाचालकांचा रस्त्यावर कब्जा

नागरिक, वाहनचालकांची गैरसोय

पनवेल : बातमीदार  : पनवेल एसटी स्थानकाबाहेर परिसरात वाहनांची कायम गर्दी असते. अशा प्रचंड गर्दीतही येथील एक मुख्य रस्ता इको आणि सहाआसनी रिक्षाचालकांनी गिळंकृत केला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेकडून कारवाई होऊनही पोलिसांचा धाक राहिलेला नाही.

पनवेल शहरातून जाणार्‍या मुंबई-पुणे महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी शहरात इलेव्हेटेड प्रकारचा उड्डाणपूल 10 वर्षांपूर्वी बांधण्यात आला. पुलामुळे पनवेल शहरात न थांबणारी वाहने थेट जाऊ लागली, मात्र उड्डाणपुलामुळे एसटी स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही. झोपडपट्ट्यांचा अडसर असल्यामुळे पुणे-मुंबई मार्गाकडील रखडलेल्या मार्गिकेच्या कामामुळे या भागात कोंडीचा सामना करावा लागतो. उड्डाणपुलाखाली उभी केलेली खाजगी वाहने, झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांची वाहने, वाटेल तिथे प्रवाशांना घेण्यासाठी उतरविण्यासाठी थांबणारे रिक्षाचालक, यामुळे रहदारीचा असलेला हा परिसर प्रवासी आणि पादचारी, वाहनचालकांसाठी गैरसोईचा झाला आहे.

पुलाखालील लाइफलाइन रुग्णालयाच्या समोरील रस्ता तर इको आणि सहाआसनी रिक्षाचालकांनी आंदण दिल्याप्रमाणे गिळंकृत केला आहे. इतर वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला आहे. 10 मीटरच्या रस्त्यावर इको आणि सहाआसनी रिक्षांच्या 50 मीटरच्या दोन रांगा लावलेल्या असतात. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक होणे बंद झाले आहे. तळोजा, नेरे आदी भागांत जाण्यासाठी प्रवासी भरण्यासाठी हे रिक्षाचालक रांग लावतात. अनेक वर्षांपासून सर्व्हिस रस्त्यावर या रिक्षाचालकांनी अतिक्रमण केल्यामुळे बसथांबादेखील मुख्य रस्त्यावर गेला आहे. कळंबोली, कल्याण, बेलापूर, दादरसाठी जाणार्‍या बस प्रवाशांना घेण्यासाठी मुख्य रस्त्यावर थांबत असल्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. इको आणि सहाआसनी रिक्षाचालकांना या मुख्य रस्त्यावरून हटविल्यास प्रवाशांची, वाहनचालकांची गैरसोय दूर होऊन एसटी स्थानक परिसर सुटसुटीत होईल, मात्र याकडे वाहतूक शाखेने दुर्लक्ष केले असल्यामुळे कधी तरी होणार्‍या कारवाईला हे रिक्षाचालक जुमानत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पनवेल शहर वाहतूक शाखेचे या रिक्षाचालकांच्या रस्त्यावरील अतिक्रमणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून वाहतूक पोलिसांचा रिक्षाचालकांवर जरब राहिलेला नाही. कधीतरी होणार्‍या कारवाईमुळे रिक्षाचालक पोलिसांना जुमानत नसल्याचे वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमणामुळे स्पष्ट झाले आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांना याबाबत विचारले असता, त्यांनीही कबुली दिली. काही दिवसांपूर्वी 35 ते 40 रिक्षांवर कारवाई करूनही रिक्षा पुन्हा रस्त्यावर उभ्या राहत असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज रस्त्यावर लागणार्‍या रिक्षांवर कारवाई करण्यात सातत्य नसल्यामुळे सार्वजनिक रस्ता या रिक्षाचालकांनी गिळंकृत केला असल्याचे स्पष्ट होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply