Breaking News

शेतीसाठी बंधारे लोकप्रेरणेने बांधण्याची गरज

पोलादपूर तालुक्यातील ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा प्रकार ‘ना पाणी अडवले ना पैसे वाचविले’ अशा प्रकारे वाया गेल्याने दरवर्षी तालुक्यात ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या धर्तीवर ‘नेमेचि येते मग पाणीटंचाई’ अनुभवावी लागते. पोलादपूर तालुका कृषी विभागाकडून केंद्रशासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आर्थिक उन्नतीचे प्रयत्न विविध कृषीविकास कामांद्वारे होत असून अनेक जणांच्या तोंडाला यामुळे पाणी सुटलेले दिसून आले. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यासाठी नानाविध क्लृप्त्या लढवल्याचे दिसून आले. त्यामुळे काही ठिकाणी थोडाफार तर काही ठिकाणी 100 टक्के भ्रष्टाचार झालेला दिसत असला तरी कार्यकर्ते जगले पाहिजेत या उदात्त हेतूने कोणीही याविरुद्ध निर्हेतूकपणे आवाज उठविताना दिसून आले नाही. परिणामी ’जो जे वांछिल तो ते लाहो’ असे मनुष्यप्राणीजातीच्या उद्धाराचे प्रयत्न झाल्यानंतर प्रत्यक्षात सिमेंट बंधारे अयशस्वी झाले आहेत. याउलट, लोकप्रेरणेने बांधण्यात आलेला आडावळे खुर्द येथील बंधारा या वर्षी यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.

केंद्रशासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पोलादपूर तालुका कृषी कार्यालयाकडून 87 गावांच्या 43 पाणलोट व्यवस्थापन कमिटया तयार करण्यात येऊन त्यांचे 7 समूह तयार करण्यात आले. या समूहांमध्ये विविध कृषीविकास कामांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये 35 सिमेंट बंधार्‍यांचे नियोजन असताना 50 सिमेंट बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट राबविण्यात आले. पार्ले, लोहारे, दिवील, तुर्भे बुद्रुक, काटेतळी या गावांत प्रत्येकी 2 तर चरई, तुर्भे खोंडा, वझरवाडी, सवाद, हावरे, माटवण, सडवली, धारवली, बोरज, उमरठ, गोवेले, ढवळे, खोपड, कुडपण, परसुले, महाळुंगे, रानवडी, बोरावळे, फणसकोंड, भोगाव बुद्रुक, कातळी, ओंबळी या गावात प्रत्येकी 1 असे सिमेंट बंधारे बांधण्याचे प्राथमिक उद्दीष्ट पूर्ण झाले. यापैकी सर्वच बंधारे पूर्णत्वास जात असताना काही ठिकाणी पाणलोट व्यवस्थापन समित्यांमधील अंतर्विरोधाची परिस्थिती आणि विरोध दूर करण्यासाठी पैशांचाच बंधारा घालण्याचे प्रयत्न यामुळे ‘मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी’ म्हणण्यास चांगलाच वाव आहे. मात्र, कोणीही खीर खाणारे बुडणार नसल्याने सिमेंट बंधारेच कुचकामी ठरले आहेत.

यापैकी सर्व सिमेंट बंधारे 31 मार्चपर्यंत पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याचा इशारा राजकीय पुढार्‍यांच्या उपस्थितीत सतत देण्यात आल्याने या कामाला उत्साहाने सुरूवात होऊन 10-15 दिवसांत बंधारे पूर्ण होण्याचा विश्वास निर्माण देण्यात आला. मात्र, यानंतर या कामाचा निधी प्रचंड प्रमाणात असल्याने ‘थोडा माल इधरभी सरकावो,’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर कार्यकर्ता जगला पाहिजे अशी हाकाटी विविध राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांनी घेतल्याने कृषीविकासकामेच मृतावस्थेत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच, या विविध कृषीविकास कामांसाठी ट्रॅक्टर, डम्पर आणि कामगार दुष्काळी भागातून आणण्याचे मार्गदर्शन पाणलोट व्यवस्थापन कमिटयांना तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आल्यानंतर आयती संधी मिळाल्याची भावना तालुका कृषी कार्यालय आणि संबंधित सिमेंट बंधारे बांधणार्‍यांमध्ये निर्माण झाली. यातूनच सुरूवातीपासून डिझेलसाठी खर्चापोटी रक्कम जमा करण्याकडे कल वाढला. ट्रॅक्टर, डम्परचे भाडेदेखील गोळा करण्याचा सपाटा तालुका कृषी कार्यालयाकडून सुरू झाला. केंद्रसरकारचे काही तज्ज्ञदेखील अनेक सिमेंट बंधार्‍यांचे अप्रतिम काम झाल्याचा दाखला देत या बंधार्‍यांची पाहणी करून गेले.  या सर्व कामांची बिले निघण्याची वेळ झाल्यानंतरही कामे अपूर्ण असताना ‘दाखवा पूर्ण, घ्या समजून’ असे पुढार्‍यांचे फोन खणखणू लागले. बंधारे बांधण्याच्या परिसरामध्ये 200 ते 500 मीटर परिसरात पाण्याचा जरासादेखील डोह अथवा साठा नसताना बांधकामावेळी उपलब्ध पाण्यात बंधारा बांधला तरी पुढे त्यावर क्युरिंगसाठी पाणी मारायला थेंबभरदेखील पाणी उपलब्ध नसल्याने पावसाळयात या सिमेंट बंधार्‍यांपैकी अनेक बंधार्‍यांना जलसमाधी मिळाली आहे.

सिमेंट बंधार्‍यांखेरिज 4 टक्केची कामे सुरू करण्यासाठी भूमिहिन, अल्पभूधारक शेतकरी सोबत घेऊन 4 कोटींचा निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू झाली. 280 कामांपैकी 90 कामे पूर्णत्वास गेली असली तरी अन्य कामांबाबत कोणी तोंड उघडण्यास तयार नाहीत, इतपत संबंधितांची पोटं खीरीन भरली आहेत. समतल चर आणि लूझ बोल्डर्स, जुनी बांधबंदिस्तीची दुरूस्ती आदी कामांमध्ये नारळ फोडण्याइतपतच कामे करण्यात येऊन त्यापुढील उद्दीष्ट कागदोपत्री पूर्ण करण्यात आले. शेतजमिनीची मशागत करण्यासाठी रस्त्यालगतचे लाभार्थी करण्यात येऊन पुढील शेतजमीनीपर्यंत ट्रॅक्टर्स नेण्याचे टाळण्यात आले आहे. समतल चर खणण्याची संख्या प्रत्येक समूहामध्ये जी दाखविण्यात आली आहे तेवढे चर खणण्याऐवजी केवळ डोळयांनी खूप वाटतील आणि प्रत्यक्षात संख्या कमी भरेल, अशी परिस्थिती असून यामुळे प्रत्येक चर खणण्यामागील मेहनत मजूरी हडपण्यात तालुका कृषी कार्यालयाला बेमालूमपणे यश आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील 55 टक्के शेती डोंगर उतारावर असल्याने डोंगर-दर्‍यांतील पाणीच शेतीला वरदान ठरणार आहे आणि तोच पावसाच्या लहरीपणावरील उपाय असल्याचे मत शेती तज्ज्ञांनी व्यक्त केले. शेतकर्‍यांची पाण्याची मागणी खुप असल्याने पाणलोट समितीमार्फत 2 लाख रूपये खर्चाचा हा वळण बंधारा बांधण्यात आला. यासाठी शेतकर्‍यांनीदेखील खुप मेहनत करून सहकार्य केले असल्याने पावसाने दडी मारलेल्या काळात डोंगरदर्‍यांतून वाहून जाणार्‍या पाण्याला या बंधार्‍याने वळवून शेतात आणण्याचे काम योग्यवेळी करणे आवश्यक ठरते. केंद्रपुरस्कृत पाणलोट समितीमार्फत करण्यात आलेले पोलादपूर तालुक्यातील सुमारे 52 बंधारे लोकसहभागाऐवजी राजकीय सहभागामुळे निरूपयोगी ठरले असताना याच तालुक्यातील आडावळे खुर्द येथील बंधारा यशस्वी झाल्याने लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे.

-शैलेश पालकर

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply