Breaking News

शिवरायांसह हुतात्म्यांची अवहेलना; कर्जत पं.स.कार्यालयात पुतळे फाटक्या छपराखाली व अंधारात

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्याची अस्मिता समजले जाणारे हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील तसेच देशाची अस्मिता समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यांची कर्जत पंचायत समिती कार्यालयात परवड सुरू आहे. पंचायत समितीच्या दुमजली कार्यालयात प्रवेश केल्यावर एका बंद खोलीत हे पुतळे असून, त्या खोलीचे छप्पर फाटून काळपट पडले आहे. तेथे मोठ्या प्रमाणात पाणीही साचले आहे आणि मुख्य म्हणजे तेथे विजेचा एकही दिवा नाही. दरम्यान, सर्वांची अस्मिता असलेले पुतळे नवख्या माणसाला दिसणारही नाहीत असे कोनाड्यात ठेवले असून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. आतापर्यंत पंचायत समिती कार्यालयात दुरुस्तीवर लाखोंचा खर्च झाला. मग हुतात्म्यांचे पुतळे असे अंधारात का, असा सवाल उपस्थित होत आहे. महात्मा गांधी यांनी चले जावची हाक मुंबईमध्ये गवालिया टँक म्हणजे आताच्या आझाद मैदानावरून दिली होती. त्या वेळी कर्जतमधून भाऊसाहेब राऊत, बॅरिस्टर विठ्ठलराव तथा भाई कोतवाल, गोमाजी पाटील मुंबईतील गवालिया टँकवर उपस्थित होते. तेथून परतल्यानंतर बॅरिस्टर कोतवाल यांनी देशप्रेमी तरुणांना एकत्र करून आझाद दस्त्याची स्थापना करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला. देश पारतंत्र्यात असतानाही आझाद दस्त्याने शाळा उघडल्या, धान्य कोठ्या सुरू केल्या. शिक्षणसंस्था सुरू केल्या होत्या व त्या आजही कार्यान्वित आहेत. त्या वेळी ब्रिटिशांनी भाई कोतवाल व गोमाजी पाटील यांच्याविरुद्ध बक्षीसही जाहीर केले होते. 2 जानेवारी 1943 साली मुक्कामी असताना फितुरांच्या माध्यमातून ब्रिटिश सैनिकांनी मुरबाड तालुक्यातील सिद्घगड येथे आझाद दस्त्याच्या जत्थ्यावर बेधुंद गोळीबार केला. त्यात आझाद दस्त्याचे प्रमुख माथेरानचे बॅरिस्टर विठ्ठलराव तथा भाई कोतवाल व मानिवलीचे हिराजी गोमाजी पाटील यांना वीरमरण आले. या हुतात्म्यांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून तत्कालीन सभापती श्रीराम पाटील यांच्या कार्यकाळात 1978मध्ये कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात पुतळे बसविण्यात आले. हुतात्मा हिराजी पाटील ज्या मानिवलीचे होते, त्याच गावचे सभापती असल्याने त्यांनी पुढाकार घेऊन पंचायत समिती कार्यालयाचे सभागृह चबुतरे बांधून हे पुतळे स्थापित केले. त्यानंतर कर्जत पंचायत समितीत होणार्‍या सर्व बैठका, मासिक सभांची सुरुवात कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज व सभागृहातील हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून होत असत. जिल्हा लोकल बोर्डाने उभारलेली कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली कर्जत पंचायत समितीची इमारत जीर्ण झाल्याने कार्यालयाचे स्थलांतर 2012मध्ये तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले. मार्केट यार्ड येथील गोदामात पंचायत समिती कार्यालय हलविल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाली. या काळात छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील यांच्या पुतळ्यांकडे दुर्लक्ष झाले. सध्या कर्जत पंचायत समितीच्या दुमजली कार्यालयात गेल्यास हे पुतळे दिसत नाहीत अशा अंधार कोठडीसारख्या खोलीत आहेत. प्रवेशद्वारासमोर असलेल्या खोलीत हे पुतळे असून तेथे विजेची सोय नाही. जेथे महान व्यक्तींचे पुतळे ठेवण्यात आलेत, त्या ठिकाणचे छप्पर काळपट पडले असून काही भागात भगदाड पडली आहेत. आजूबाजूस हुतात्म्यांबद्दल माहिती देणारा एकही शब्द लिहिलेला नाही. येथे पावसाचे पाणीही साचत असल्याने कर्जत पंचायत समितीने हुतात्म्यांचा अवमान केल्याची भावना निर्माण झाली आहे.

इमारतीच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन्ही हुतात्म्यांबद्दल सर्वांना अभिमान आहे. आम्ही पुतळे ठेवलेला भाग सुशोभीत करण्याचा प्रस्ताव बांधकाम खात्याला दिला आहे.

-सी. एस. राजपूत, प्रभारी गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती

कर्जत पंचायत समितीमध्ये पुतळे हलविले त्याच वेळी आपण ती सर्व खोली आपल्या क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानकडून सुशोभीत करून देण्याची तयारी दर्शविली होती, परंतु हे काम आम्ही करणार आहोत असे सांगून आता दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्यांनी एकदाचे सांगून मोकळे व्हावे. मग हुतात्म्यांची परवड करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून देऊ.

भरत भगत, माजी सदस्य, कर्जत पंचायत समिती

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व दोन्ही हुतात्म्यांबद्दल आदर आहे. त्यामुळे तो हॉल आम्ही अन्य कामासाठी वापरत नाही. काही दुर्लक्ष झाले असेल तर तत्काळ बदलासाठी आपण स्वतः आघाडीवर राहून तेथील परिसर सुशोभीत करून घेऊ. त्याचा प्रस्तावही तयार आहे.

-सुजाता मनवे, सभापती, कर्जत पंचायत समिती

जर कोणाचा हुतात्म्यांचा अवमान करण्याचा हेतू असेल, तर हुतात्म्यांच्या अस्मिता लक्षात घेऊन जातीपातीचा विचार न करता सर्व धावून येतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळे प्रशासनाने अशी वेळ येऊ देऊ नये, मात्र अशी परिस्थिती वारंवार निर्माण होताना दिसत आहे. याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा.

-वसंत कोळंबे, इतिहास संशोधक

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply