Breaking News

माणगाव स्फोटातील जखमी कामगारांपैकी दोघांचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी

विळे-भागाड औद्योगिक वसाहतीतील क्रिप्टझो कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात भाजलेल्या कामगारांपैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राकेश हळदे (वय 30, रा. रा. उंबर्डी, ता. माणगाव) आणि आशिष येरूणकर (रा. म्हसेवाडी, ता. माणगाव) अशी या दोघांची नावे आहेत.

माणगाव तालुक्यातील  क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी चारच्या सुमारास अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला होता. या दुर्घटनेत 18 कामगार भाजून जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबईच्या ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर रुग्णालयात हलविण्यात आले होतेे. त्यापैकी राकेष हळदे आणि आशिष येरूणकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांचे वारस, जखमी कामगारांना आर्थिक मदत देण्याची मागणी

क्रिप्टझो कंपनीत झालेल्या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना 60 लाख रुपये व जखमी कामगारांना 30 लाख रुपयांची आर्थिक मदत कंपनीकडून मिळावी, अशी मागणी जय भवानी जनरल कामगार युनियन संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष यशवंत गंगावणे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी सहकार्‍यांसह माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांना शनिवारी (दि. 16) दिले.

निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटनेचे कार्याध्यक्ष विठ्ठल मोहिते, युनियन सदस्य उमाजी बगडे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ पवार आदी उपस्थित होते.

मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना कंपनीने तत्काळ भरपाई द्यावी, दुर्घटनेत जे कामगार नेत्रहीन झाले आहेत त्यांना 60 लाख रुपये मदत कंपनीने द्यावी, ज्यांना दुखापत झाली आहे त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत सामावून घ्यावे, तसेच या घटनेबाबत कंपनीचे एमडी, मॅनेजर, संचालक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, पोलिसांनी नि:पक्षपातीपणे व सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशा मागण्या कामगार युनियनच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास युनियनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनाची प्रत माहितीसाठी उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसीलदार प्रियंका आयरे, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना देण्यात आली आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply