नोव्हेंबर 2020चे लक्ष्य; ‘इस्रो’कडून तयारी सुरू
बंगळुरू : वृत्तसंस्था
पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशाचा अनुभव गाठीशी घेऊन आता इस्रो चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न करणार आहे. इस्रोने चांद्रयान-3 मोहिमेवर काम सुरू केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या मोहिमेसाठी नोव्हेंबर 2020पर्यंतचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. इस्रोने वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या असून, ऑक्टोबरपासून या समित्यांच्या आतापर्यंत चार उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत. चांद्रयान-2 मोहिमेतील ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे नव्या मोहिमेत फक्त लँडर आणि रोव्हरचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी चांद्रयान-3 संबंधी समितीची बैठक झाली. शास्त्रज्ञांच्या तीन उपसमित्यांनी प्रोप्लशन, सेन्सर्स, नॅव्हीगेशन आणि इंजिनिअरींगसंबंधी केलेल्या सूचनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. चांद्रयान-3 मोहिमेचे काम वेगात सुरू असून लँडिंग साईट, दिशादर्शनासह 10 महत्त्वाच्या गोष्टींकडे इस्रोने विशेष लक्ष दिले आहे. लँडर अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्याकडे इस्रोने विशेष लक्ष दिले आहे. नव्या मिशनमध्ये लँडरचे पाय भक्कम करण्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, जेणेकरून वेगात लँडिंग झाले तरी लँडर सुस्थितीत राहील. चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरने अपेक्षेपेक्षा जास्त वेगात लँडिंग केले. त्यामुळे लँडरचे नुकसान झाले होते. चंद्रावर विक्रम लँडर कुठे आहे? त्याची स्थिती काय आहे? ते अजूनही समजू शकलेले नाही. त्यामुळे मागच्या मोहिमेतील चुका टाळून चंद्रावर यशस्वी लँडिंग करण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे. पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये यश मिळाले नसले तरी भविष्यात पुन्हा एकदा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न करण्यात येईल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले होते. आम्हीसुद्धा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकतो, हे दाखवून देण्यासाठी इस्त्रो जीवाची बाजी लावणार आहे. त्यासाठीच्या योजनेवर जोमात काम चालू आहे, अशी माहिती सिवन यांनी आठवडाभरापूर्वी दिली होती. लँडिंगसंदर्भात सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवून आणण्यासाठी अमूल्य माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. नजिकच्या भविष्यात भारत अनुभव, ज्ञान आणि तांत्रिक क्षमतेद्वारे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकतो हे दाखवून देईल, असे सिवन म्हणाले होते.