Breaking News

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक प्रा. एन. डी. पाटील यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील व्यक्तीस, संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम दोन लाख रुपये व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करून पारितोषिक निवड समितीने प्रा. एन. डी. पाटील यांची या पारितोषिकासाठी निवड केलेली आहे. प्रा. एन. डी. पाटील अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेसारख्या अग्रगण्य शिक्षण संस्थेत अध्यक्ष, कार्यवाह म्हणून कार्य करीत आहेत. त्या संस्थेत त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र वगैरे उपक्रम सुरू करून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संस्थेस आधुनिक रूप दिले आहे. 18 वर्षे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले व दोन वर्षे सहकार मंत्री म्हणून काम केले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी 25 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रा. एन. डी. पाटील यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राजहंस प्रकाशन निर्मित व राम खांडेकर लिखित सत्तेच्या पडछायेत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply