पनवेल : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे डुंगी गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण गावाला करंजाडे येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील शाळेमधील दोन वर्गात या ग्रामस्थांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र स्थलांतरित केलेले डुंगी ग्रामस्थ गावात चोरीच्या भीतीने चिंतेत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे हाल झाले. मागील वर्षी देखील गावात पुराचे पाणी शिरले होते. मध्यंतरी डुंगी गावाचे देखील पुनर्वसन करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तसा प्रस्ताव सिडकोने शासनाकडे पाठविला आहे, मात्र गावात शिरलेल्या पाण्यामुळे संपूर्ण गावाचे येथील कारंजाडे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित केल्यानंतर संपूर्ण डुंगी गाव ओस पडले आहे. ग्रामस्थांचे स्थलांतर केले असले, तरी घरातील मौल्यवान वस्तू, सर्व सामान घरात असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. दरम्यान, पावसाळ्यात ग्रामस्थांनी बाहेर राहण्यासाठी तहसील प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना 50 हजारांची मदत तहसीलदार अमित सानप यांनी केली. त्यानुसार बुधवारी 50 हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये 111 कुटुंबांना धनादेशाचे वाटप करण्यात आले, तर उर्वरित 30 कुटुंबांची चाचपणी सुरू असल्याचे सानप यांनी सांगितले. सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनीही स्थलांतरित ग्रामस्थांची भेट घेऊन सहकार्याचे आश्वासन दिले.