Breaking News

कर्जत पालिकेकडून जलकुंभांची स्वच्छता

प्रत्येक टाकीत होता सहा इंच मातीचा थर

कर्जत : बातमीदार

कर्जत शहराची वाढीव नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यापासून या योजनेतील जलकुंभ स्वच्छ करण्यात आले नव्हते. 20 वर्षांनंतर आता या योजनेतील जलकुंभ स्वच्छ केले जात आहेत. त्यात प्रत्येक जलकुंभामध्ये सुमारे सहा इंच मातीचा थर आढळून आला. दरम्यान, जलकुंभ स्वच्छ केल्याने कर्जत शहराला  स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळू लागले आहे.

कर्जत शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन 1998मध्ये तत्कालीन युती सरकारने वाढीव नळपाणी योजना मंजूर केली होती. या योजनेत आकुर्ले, गुंडगे, भिसेगाव, विश्वनगर आणि कचेरी आदी ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दहिवली समर्थनगर भागात असलेल्या जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध करण्यात आलेले पाणी या जलकुंभांमध्ये आल्यानंतर ते पुढे शहरात वितरित केले जाते, मात्र या जलकुंभांची स्वच्छता केली जात नसल्याने त्यात गाळ साठून राहिला होता. 

कर्जत नगर परिषदेने शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याआधी वेगवेगळ्या सहा ठिकाणी असलेले जलकुंभ स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत गुंडगे, विश्वनगर, आकुर्ले आणि कचेरी येथील जलकुंभात साठलेला गाळ काढून ते स्वच्छ करण्यात आले. त्या वेळी सक्शन पंप लावून गाळमिश्रित पाणी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जास्त दाबाने पाणी सोडून जलकुंभ स्वच्छ करण्यात आले व औषध फवारणी करण्यात आली. कचेरी येथील मोठा जलकुंभ दोन दिवसांत, तर गुंडगे, विश्वनगर, आकुर्ले येथील जलकुंभ प्रत्येकी एका दिवसात स्वच्छ करण्यात आला. आता भिसेगाव आणि विश्वनगर येथील जलकुंभ स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामांमुळे पुढील 10 वर्षे या जलकुंभातून अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार नाही.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply