माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला वेढले आहे. या महामारीला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या संकटात माणगाव तालुक्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी आपली व आपल्या कुटुंबाची चिंता न करता देशसेवा म्हणून कर्तव्य बजावताना कोठेच कमी पडत नसून या सर्व पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याची प्रतिक्रिया माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसारमध्यामांशी बोलताना दिली.
संजयआप्पा ढवळे म्हणाले की, जगावर कोरोनाच्या नावाने आणीबाणीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकार जनतेला या विषाणूवर मात करण्यासाठी योग्य त्या सूचना करीत आहेत. सरकारने दिलेल्या सूचनांच्या बाबतीत प्रशासन म्हणून पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. माणगाव तालुका कोरोनामुक्त राहिला पाहिजे ही त्यांची तळमळ आहे. विनाकारण बाजारपेठेत अथवा अन्य ठिकाणी व गावात गर्दी करू नका. कामाशिवाय बाजारपेठेत येऊ नका. दुचाकीवर वारंवार फेर्या मारू नका. जास्तीत जास्त वेळ घरातच राहा, असे आवाहन पोलीस सातत्याने तालुक्यातील जनतेला करीत आहेत. उगाचच कोणत्याही वाहनचालकावर जप्तीची कारवाई करण्याची त्यांची इच्छा नाही. जगावर आलेला हा प्रसंग अत्यंत बिकट असून यातून आपणाला लवकरात लवकर कसे बाहेर पडता येईल यासाठी पोलीस प्रयत्नशील असून त्यांना माणगावकरांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांना माणगाव तालुक्यातील जनतेने जास्तीत जास्त सहकार्य करून आपण सर्वांनी सामुदायिक एकजूट दाखवून सरकारच्या सूचनांचे पालन करू तसेच कोरोनाच्या विळख्यातून लवकरच बाहेर पडून विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणू या, असे आवाहनही संजयआप्पा ढवळे यांनी केले आहे.