महाड : प्रतिनिधी
महाड शहरासह परिसरातील गावांमध्ये मटका आणि इतर धंदे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. काही तथाकथित पत्रकार या अवैध धंद्यांना अभय मिळावे म्हणून प्रयत्न करीत असल्याची चर्चा असतानाच शनिवारी
(दि. 7) महाड शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एक मटका अड्ड्यावर छापा मारून एकाला मुद्देमालासह अटक केली आहे.
महाड तालुक्यात हायफाय हॉटेलपासून ते गल्लीबोळात मटका व जुगाराचे अड्डे सुरू असून, कधी अलिबाग गुन्हे अन्वेषण विभाग, तर कधी महाड पोलीस या अवैध धंद्यांवर कारवाई करीत असतात. महाड शहरालगतच्या ग्रामीण भागातही हे अवैध धंदे पाय पसरू लागले आहेत. या अवैध धंद्यांविरोधात पोलीस यंत्रणेने कंबर कसली असल्याने असे धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे हे मालक वेगवेगळे पुढारी, पत्रकारांद्वारे मध्यस्थी करण्याचे प्रयत्न करीत आहेत, मात्र त्याला न जुमानता महाड शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगर परिषदेच्या गाळ्यात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. अवसरमोल यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली. या वेळी तीन हजार 910 रुपये रोख, जुने मोबाइल, वही-पुस्तकांसह दिनेश बाबू चिवीलकर (वय 39, रा. नवेनगर) याला अटक केली. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम 1988चे कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मटका धंद्याचा मालक अनंत पांडुरंग पवार हा असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.