Breaking News

चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान

रेवदंडा : प्रतिनिधी

 अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथील दत्त जयंतीपासून पाच दिवस चालणार्‍या यात्रेला रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणाहून सुमारे तीन लाख भाविक येतात. अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठी व वर्षातील शेवटची यात्रा दत्त जयंतीला उत्साहात साजरी होते.

चौल भोवाळे येथील श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान फारसे  पुरातन नसले तरी इतिहासीक निश्चित आहे. कारण आंग्रेच्या उत्तरकालीन इतिहासात या दत्त मंदिराचा उल्लेख वरचेवर आढळतो. तसेच आंग्रे घराण्यातील पुरूषांची या पर्वतवासी दत्तांवर अतिशय श्रध्दा होती. हा दत्त नवसाला पावतो व त्याच्या दर्शनाने अडीअडचणीचे निवारण होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.

या स्वयंभू देवस्थानाची माहिती अतिशय रंजक आहे. इ.स. 1810 च्या मार्च, एप्रिलमध्ये डोंगरावर कोणी एक गोसावी राहत होता. त्याने तिथे एक मठी बांधली. हा गोसावी दत्ताची भक्ती करीत असे. एक दिवस त्याने दत्तांच्या पादुका पुर्वीच्या जागेवरून काढून त्या आपल्या मठीत आणल्या. पुढे 1831 मार्च, एप्रिलमध्ये तेथे एक पाषाणाची दिपमाळ बांधण्यात आली. 1834 च्या डिसेंबरमध्ये गोविंद वाडकर नावाच्या रेवदंड्याच्या कोळी गृहस्थाने पादुकांच्या भोवताली प्रदक्षिणेची साधी असलेली वाट चुनेगच्चीची केली. 1843 मध्ये गणेशभट गुजराथी प्रभासकर यांनी भिक्षा मागून पैसे जमविले आणि मठीचा जीर्णोध्दार केला, त्यावर कौलारू मंडप बांधला. या ठिकाणी एक फिरता बैरागी वस्तीस आला. त्यांने 1857  च्या नोव्हेंबरमध्ये दत्ताची एक पाषाण मुर्ती आणली आणि तिची जुन्या पादुकांजवळ स्थापना केली.

 चौल भोवाळे येथे श्री दत्त जयंतीपासून पाच दिवस यात्रा भरते. यात्रेच्या पहिल्या दिवशी पाचकळशी समाजाच्या मंडळीनी सुमारे 40 ते 60 वर्षापुर्वी तयार केलेला चांदिचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून वाजतगाजत दत्त मंदिरात आणला जातो आणि तो मुळ दत्तमूर्तीला चढविला जातो. यात्रेपुर्वी या श्री दत्त मंदिरात हरिनाम सप्ताह चालतो. या सप्ताहात आंदोशी गावापासून रामराजपर्यतची सुमारे 19 गावे सहभागी होतात. दर गुरूवारीसुध्दा भक्तगण बहुसंख्येने येथे दत्त दर्शनासाठी येतात. तसेच सहलीला येणारे पर्यटकसुध्दा श्री दत्तात्रयांचे दर्शन घेतात. या पर्वतवासी दत्त मंदिरात जाण्यासाठी सुमारे सातशे पायर्‍या चढाव्या लागतात. अर्ध्या पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थाचा मठ आहे. येथूनच पुढे बुरांडे महाराज समाधी मंदिर आहे. थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूला नवनाथ संप्रदायांचा दरबार आहे. श्री दत्त मंदिराच्या पाठीमागे म्हणजे पश्चिमेला चौल व रेवदंडा, अलिबाग तालुक्यास जोडणारा रेवदंडा पुल, कोर्लईचा किल्ला, कुंडलिका खाडी, वेलस्पुन कंपनी आणि अथांग अरबी सागर दिसतो. श्री दत्त मंदिराच्या दक्षिणेला खाली उतरले की लगेचच माई जानकीबाई हनुमानदास मठ लागतो. तेथून पायवाटेने खाली उतरले की हिगुंळजा देवीचे मंदिर आहे. येथे बुध्द लेणी पहावयास मिळतात. हिंगुळजा देवीच्या मंदिराला लागूनच अन्नपुर्णा देवीचे स्थान आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply