Breaking News

अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात चर्चा आणि मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, घनकचरा, सांडपाणी आणि उपाययोजना, उपजिल्हा रुग्णालय तसेच शाळांच्या हस्तांतरणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीवर चर्चा आणि त्या अनुषंगाने मागणी केली.
सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे आणि या महापालिकेच्या अवतीभोवती असलेले क्षेत्रसुद्धा आता नागरी भागात परिवर्तित होत आहे. या भागामध्ये सेवा देणे आणि नियंत्रण ग्रामविकास विभागाकडे आहे. नव्याने सिडकोच्या माध्यमातून परिसरामध्ये नैना प्राधिकरण आलेले आहे, पण नैना नियोजन प्राधिकरणाकडून ग्रामविकासासाठी आवश्यक तसा सहभाग त्यामध्ये घेतला जात नाही. पनवेल तालुक्यातील परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घनकचरा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक ग्रामपंचायतींकडे त्यांच्या कचर्‍याचा व्यवस्थापनाची सिस्टीम नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तो कचरा सार्वजनिकरीत्या रस्त्यावर टाकला जातो. ग्रामपंचायती आपल्या सांडपाण्याचे नियोजन करीत नाही. नदीमध्ये सरसकटपणे मैला पाणी सोडले जात आहे. याकडे शासनाने विशेषतः ग्रामविकास विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या ग्रामपंचायतींना एकत्रित मिळून त्यांच्या घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात योजना अमलात आणण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची लोकसंख्या जास्त आहे. या ग्रामपंचायतींनी एकत्रित येऊन कचर्‍याच्या ट्रिटमेंटमध्ये त्या ठिकाणी शासन व ग्रामपंचायतीचा निधीतून व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
शहरामध्ये घरे परवडत नाही, म्हणून शेजारील गावांमध्ये लोकं राहायला आली, पण त्या गावापर्यंत पोहचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक नसल्यामुळे लोकांना स्वतःच्या छोट्या छोट्या वाहनांनी प्रवास करावा लागतो. अशा वेळेला या सर्व विभागातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या परिसरातील हद्दीमध्ये स्ट्रीट लाईटचे नियोजन करणे गरजेचे आहे, मात्र त्यांच्याकडे निधी नसल्याने ते करू शकत नाही. त्यामुळे सुविधांच्या बाबतीत शासनाने विशेष लक्ष द्यावे आणि नागरिकांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा मिळाव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
शाळांचे पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण करा
जिल्हा परिषदेच्या 51 शाळा महापालिका हद्दीत असूनही त्याचे व्यवस्थापन मात्र ग्रामविकास विभागाकडे आहे. या शाळांना पायाभूत व इतर सुविधांची गरज असल्याने या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात केली.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध करा
रुग्णालय 200 खाटांचे निर्माण करा; 100 खाटांचे ट्रॉमा केअर हॉस्पिटल उभारा
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक स्टाफ आणि संपूर्ण सुविधा दिल्या जात नाही आणि रुग्णांची संख्या पाहता हे शंभर खाटांचे रुग्णालय अपुरे पडत आहे. त्यामुळे ते आता 200 खाटांचे रुग्णालय करा तसेच वाढते अपघातांचे प्रमाण पाहता या ठिकाणी अपघातांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असून 100 खाटांचे ट्रॉमा केअर हॉस्पिटल उभारावे. त्याचबरोबर शवविच्छेदनला प्रचंड विलंब होत असल्याने पोस्टमार्टम सेंटर निर्माण करा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ऑनलाईनमधील त्रुटी दूर करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मी सरकारचे अभिनंदन करून आभार मानतो, पण सद्यस्थितीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या त्रुटी दूर करून ही यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply