Breaking News

‘माचीप्रबळ’च्या पर्यटकवाढीसाठी आदिवासी बांधवांचे यशस्वी प्रयत्न

पनवेल ः बातमीदार

माथेरानच्या मागील बाजूस असलेल्या पनवेल तालुक्यातील माचीप्रबळ गडावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक आदिवासींनी एकत्र येऊन पर्यटकवाढीसाठी केलेले प्रयत्न यासाठी यशस्वी ठरले असून पर्यटनस्थळ नसतानाही या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेला माचीप्रबळ गड आणि वनाचा विकास व्हावा, यासाठी येथील स्थानिक आदिवासींनी आकर्षित केले आहे. माथेरान डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या माचीप्रबळ डोंगर हा माथेरानसोबत संवेदनशील क्षेत्र म्हणून नोंद आहे. या डोंगरावर जाण्यासाठी वाट नसल्यामुळे या भागाचा विकास झाला नाही. ट्रेकिंग करण्यासाठी येणारे पर्यटक आदिवासींनी पाडलेल्या पाऊलवाटने डोंगरावर येतात. सुरुवातीला येथे कसलीही सुविधा नसल्यामुळे पर्यटक समाजमाध्यमांवर पर्यटकांना माचीप्रबळ डोंगरावर काही सुविधा नाहीत, राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, सोबत खाण्याचे सामान घेऊन जा, असा सल्ला देत असत.

माचीप्रबळ डोंगरावर राहणारा पहिला पदवीधर नीलेश भुतांबरा या तरुणाच्या वाचनात ही बाब आली. सुमारे 200 लोकसंख्या असलेल्या डोंगरावरील आपल्या गावात आपण पर्यटकांना ही सुविधा दिल्यास पर्यटक आपल्याकडे येतील म्हणून नीलेशने ग्रामस्थांना एकत्र केले. येणार्‍या पर्यटकांना सोयीसुविधा देण्यास त्याने सुरुवात केली. एनजीओ प्रबळगड टुरिझम नावाने वेबसाइट विकसित करून पर्यटकांना माहिती देण्यास त्याने सुरुवात केली. वाटेत लिंबूसरबत विकण्यासह ऑर्डर दिल्यास जेवणाची सोय आणि महिलांसाठी शौचालयाची सोय उपलब्ध केली. अशा सोयीसुविधा देण्यास सुरुवात केल्यामुळे गावातील प्रत्येक घरात एका व्यक्तीला रोजगार मिळाला आहे.

पर्यटकांना राहण्यासाठी स्वत:च्या घरात सोय केल्यामुळे पर्यटक वाढू लागले आहेत. चुलीवर बनविलेलं पिठलं-भाकरी, दही अशा घरगुती जेवणामुळे येथील महिलांना रोजगार मिळाला. दीड वर्षांपूर्वी माचीप्रबळगडाच्या रहिवाशांनी सुरू केलेल्या कामात आणखी भर पडली आहे. वन विभागाने वनसंयुक्त समितीच्या माध्यमातून देखभाल करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता येथील आदिवासींच्या कामाला चांगली साथ मिळाली आहे. एका पर्यटकाकडून 50 रुपये दर आकारला जातो. हे पैसे येथील देखभाल-दुरुस्तीसाठी राबणार्‍यांना रोजगार म्हणून दिले जातात. येथील स्वच्छता, कचराकुंडी, दिशादर्शक फलकाचे काम याच माध्यमातून होत आहे.  उन्हाळा वगळता ट्रेकिंगसाठी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात असतात. गतवर्षी जुलै 2018 ते जुलै 2019 मध्ये तब्बल 26 हजार पर्यटकांनी माजीप्रबळगडाला भेट दिल्याची नोंद वनविभागाकडे असल्याचे संयुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पारधी यांनी सांगितले. सध्या गडावर येणार्‍या पर्यटकांमुळे 40 तरुणांना रोजगार मिळाला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply