मतदारांचा दांडगा उत्साह; मतदान प्रक्रिया शांततेत
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण मतदारसंघातील शहरी भागांत मतदानाचा टक्का घटला. उरण आणि पनवेल मतदारसंघातील ग्रामीण भागांत मतदारांनी उत्साह दाखवला. सोमवारी सकाळी पाऊस आणि दुपारी उन्हाचा तडाखा वाढला असताना मतदारांचा उत्साह मावळलेला दिसला. बेलापूरमध्ये 44 टक्के, ऐरोलीत 42, पनवेल 54.13 आणि उरणमध्ये 74.32 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. चारही मतदारसंघांत किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. तळोजा येथील कमळ गौरी विद्यालयातील केंद्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि मतदान पावत्या 19 मतांच्या नोंदणीनंतर बंद पडले. येथील निवडणूक निरिक्षक प्रदीप कांबळे यांनी तातडीने हे यंत्र बदली करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत नागरिकांची रांग वाढली होती. मात्र अर्धातासानंतर नवीन इव्हीएम यंत्राने मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. काळुंद्रे गावात काही काळासाठी मतदान यंत्र बंद होते. मात्र अधिकार्यांनी तातडीने उपाययोजना केल्यानंतर येथेही यंत्र पुन्हा सुरू करण्यात आले. पनवेल शहरातील मतदारांना आवाहन करण्यासाठी निवडणूक आयोगाने वि. खं. विद्यालयात सेल्फी पॉइंट उभारला होता. मी केलंय, तुमचं काय, असा आशय त्यावर ठळक शब्दांत लिहिलेला होता. या खिडकीत सेल्फी काढून समाजमाध्यमांवर पसरविण्यात आले. सकाळच्या सत्रात आठ वाजेपर्यंत पनवेल शहरातील गुजराती शाळेत भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला. उरण विधानसभा मतदारसंघात सकाळी मतदान केंद्रांवर मतदारांना तुरळक रांगा होत्या. ग्रामीण भागांत मतदारांचा काही प्रमाणात उत्साह दिसून आला. शहरी भागात मात्र निरुत्साह दिसून आला. कामगार वसाहतींमध्ये हे चित्र कायम होते. दुपारी तीन वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाले होते. जासई, चिरनेर तसेच कोप्रोली आदी ग्रामीण भागातील केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. सकाळी 9 वाजेपर्यंत उरण विधानसभा मतदार संघात 6 टक्के मतदानाची नोंद झाली होती. उरण शहरातील काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्रे तसेच मतदान पावती यंत्रणा बंद पडल्याच्या घटना घडल्या. मात्र अतिरीक्त मशीन तातडीने बदलण्यात आल्या. मतदानात अनेक ठिकाणी महिलांची संख्या अधिक होती. ज्येष्ठ नागरिक, आदिवासी, कामगार अशा सर्व स्तरातील मतदार मतदान करण्यासाठी येत होते. जासई येथील खास महिलांसाठी सखी मतदान केंद्र उभारण्यात आलेले होते. या मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर सेल्फी काढण्याची सोय करण्यात आलेली होते. अनेक ठिकाणी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची, व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती.