महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालामध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सक्रिय प्रयत्नांतून पूर्वीच्या मातामृत्यूचे प्रमाण प्रतिलाख मातांमागे 70 होते, ते आता 35पेक्षा कमी झाल्याचा दावा करण्यात आला. या दावा जाहीर झाल्याला केवळ 48 तास ओलांडले असताना हा अहवाल जाहीर होण्याच्या प्रक्रियेत असतानाच पोलादपुरातील दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील एका मातेची बाळंतपणादरम्यान कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली. त्यावेळीच्या वैद्यकीय अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे तिचा हकनाक बळी गेला. महिलांवरील सामाजिक अत्याचारांबाबत संवेदनशील असलेला कायदा व समाज तसेच प्रशासन प्रत्यक्षात महिलांच्या अनारोग्य तसेच उपचारादरम्यान संवेदनाशून्य होऊन या घटनेची वाच्यतादेखील करणे टाळतो. यामुळेच 1 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या या मातामृत्यूची माहिती सुमारे आठवडाभराने उशिरा चर्चेत येते. या सर्व घटनाक्रमांत सरकारी आरोग्य यंत्रणेची सुसज्जता नसणे ही सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरली आहे तसेच या आरोग्य यंत्रणेमध्ये झारीचे शुक्राचार्य बसलेले दिसून येतात. त्यांचे उच्चाटनही करण्याची गरज आहे. पुन्हा कोणी गरीबाघरची सूनबाई अशी बाळंतपणादरम्यान मृत्युमुखी पडू नये अथवा पुन्हा कोणी गबिाची मुले आईविना पोरकी होऊ नयेत ही अपेक्षा बाळगून 10 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या मानवी हक्क जागृतीदिनाच्या औचित्यासह या मातामृत्यूच्या घटनेची चौकशी मानवी हक्क आयोगामार्फत होण्याची गरज व्यक्त होत आहे.
पोलादपुरातील तांबडभुवन भागातील एका कष्टकरी कुटुंबातील बाळंतीण महिला माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिझेरीयन प्रसूतीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर अत्यवस्थ झाल्याने जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर तिथे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झाली. मात्र यासंदर्भात माहिती घेण्यासाठी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली असता त्यांनी दिलेल्या माहितीदरम्यान मृत बाळंतिणीच्या मृत्यूपर्यंतच्या घटनाक्रमात रायगड जिल्ह्यातील कुचकामी आरोग्य यंत्रणांचे फाटके पदर उघड झाल्याचे दिसून आले. मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथील पोलिसांनी मृत बाळंतिणीच्या पतीकडून कोणावरही आक्षेप नसल्याचा जबाब घेतल्यानंतर मृत बाळंतिणीचे प्रेत ताब्यात दिले. यानंतर संपूर्ण कुटुंब गेल्या सहा दिवसांपासून मानसिक कोंडमारा सहन करीत असल्याने त्यांनी सर्व घटनाक्रम शोकयुक्त संतापाने सांगितला.
पोलादपुरातील तांबडभुवन येथे अनेक वर्षे वास्तव्यास असलेले लाड कुटुंबीय दारिद्य्ररेषेखालील असून त्यांना घरकुल मंजूर झाल्याने ते गोकुळनगर भागात राहण्यास गेले. संकेत आणि त्याची पत्नी सोनल लाड या जोडप्याला तीन वर्षांची मुलगी असून तिघेही आईवडील, भाऊ-वहिनी पुतण्या यांच्यासोबत या घरकुलात एकत्रित कुटुंब पध्दतीने राहत असत. सोनलला पहिले बाळंतपण सिझेरियन करावे लागून मुलगी झाली होती. दुसर्यांदा दिवस गेल्यानंतर नियमित तपासणी करण्यासाठी मनाली येरूणकर या आशासेविकेच्या मदतीने सोनल पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात जात असे, अशी माहिती मृत सोनलचा पती संकेत लाडने या वेळी दिली.
28 नोव्हेंबरला सोनलच्या सोनोग्राफीत गर्भाची वार खालील बाजूस आल्याचे दिसल्याने डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी सोनल आणि संकेत यांना दुसरे बाळंतपणही सिझेरीयन करावे लागेल, अशी माहिती दिली. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात सिझेरीयन बाळंतपण वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील करू शकत असूनही सिझेरीयन बाळंतपणासाठी आवश्यक सुविधा नाहीत, तर महाड येथे सर्व सुविधा असूनही सिझेरीयन करणारे डॉक्टर नसल्याचे सांगून डॉ. पाटील यांनी सोनलला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सिझेरीयन बाळंतपणासाठी डॉ. घोंगडे यांना चिठ्ठी लिहून दिली, मात्र डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी यासाठी महाड येथे उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून सोनलचे सिझेरीयन बाळंतपण करण्याचे टाळले, असे संकेत लाडचे म्हणणे आहे.
पोलादपूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांची चिठ्ठी घेऊन माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. घोंगडे यांनी सोनलला 29 नोव्हेंबरला सिझेरीयनसाठी दाखल करून घेतले. तेथे तीन बाळंतिणींची सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉ. घोंगडे यांनी सोनलची सिझेरीयन शस्त्रक्रिया सुरू केली. याचवेळी अन्य वॉर्डामध्ये इमर्जन्सी पेशंट आल्याने डॉ. घोंगडे हे सुमारे 10-15 मिनिटे ऑपरेशन रूममधून बाहेर येऊन इमर्जन्सी पेशंट पाहण्यासाठी गेले. यानंतर डॉ. घोंगडे पुन्हा सोनलच्या सिझेरीयनसाठी गेले व त्यांनी 15 मिनिटांत बाहेर येऊन मुलगा झाल्याचे सांगितले आणि तेथील नर्सने एक बाळ संकेतच्या आईकडे दिले. या वेळी सोनलची कुटुंब नियोजनाचीही शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र यानंतरही तब्बल अर्धा-पाऊण तास
सोनलची पती व सासूसोबत भेट होऊ दिली नाही. त्यानंतर सोनलला ऑपरेशन रूममधून एका बेडवर आणले गेले. तिच्या चेहर्यावर वेदना होताना दिसत असूनही रात्री तिने दोन वेळा बाळाला दूधही पाजले. यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वेदना असह्य होऊ लागल्याने तिने पती संकेत व सासूला सांगितले. या वेळी डॉ. घोंगडे यांनी सोनल बरी होईल, असे पती संकेत व तिच्या सासूला सांगितले आणि सोनलला रक्ताच्या तीन बाटल्या देण्यात आल्या. यादरम्यान सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तिच्या लघवीच्या पिशवीतून तीन वेळा तिची लघवी आशासेविका मनाली येरूणकर यांनी ओतली, मात्र डॉ. घोंगडे यांनी सोनलला तपासल्यानंतर लघवी अडकल्यामुळे मुंबईला जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल, असे सांगून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एक खासगी अॅम्ब्युलन्स करून दिली. त्यांनी सोबत दिलेली नर्स अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरशेजारील सीटवर बसली, तर सोनलशेजारी तिचा नवरा, आशासेविका मनाली येरूणकर व नवजात बाळ होते. या वेळी सोनलच्या सासूला अॅम्ब्युलन्समधून नेण्याचे टाळले. कोलाड फाट्याजवळ ही अॅम्ब्युलन्स बदलून 108 अॅम्ब्युलन्स देण्यात आली. या वेळी स्ट्रेचरवरून सोनलला त्या अॅम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आले. यादरम्यान सोनलच्या नाका-तोंडातून तसेच सिझेरीयन शस्त्रक्रियेनंतर घातलेल्या टाक्यांतून रक्तस्त्राव सुरू झाला. तिची देखभाल करण्यासाठी पती संकेत व आशासेविका येरूणकर यांच्याखेरिज कोणीही नव्हते. यापुढे पुन्हा पनवेल येथे 108 अॅम्ब्युलन्स बदलून दुसरी 108 अॅम्ब्युलन्स देण्यात आली. पुन्हा सोनलला स्ट्रेचरवरून त्या अॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आले. यानंतर संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही 108 अॅम्ब्युलन्स मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये पोहचली. या वेळी प्रथम सोनलला अपघात विभागात नेण्यात आले. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अत्यवस्थ अवस्थेत पोहचलेल्या
सोनलला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तीन अॅम्ब्युलन्स बदलून 14 तासांनंतर जे. जे. हॉस्पिटलपर्यंत पोहचताना झालेला रक्तस्त्राव खूपच जास्त होता. तेथे डॉक्टरांनी सोनलच्या सिझेरीयननंतर घातलेले टाके दाबून पोटात झालेले रक्त बाहेर काढले. हे सांगताना माणगावचे डॉ. घोंगडे यांनी सोनलची लघवी अडकल्याचे सांगितले असताना रक्त का काढले जात होते, असा सवाल सोनलचा पती संकेत लाडने केला.
जे. जे. हॉस्पिटलमध्ये सोनलचे पुन्हा ऑपरेशन करून तिच्या पोटातील रक्तस्त्रावामुळे झालेल्या रक्ताच्या गुठळ्या व गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यात आली. तिला पांढर्या पेशीच्या 16 बॅग व रक्ताच्या 12 बाटल्या देण्यात आल्य, मात्र यादरम्यान तिची प्रकृती खूपच खालावली व 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सोनलचा मृत्यू झाल्याची माहिती जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली, असे शोकाकुल पती संकेतने सांगितले. मृत सोनलचे प्रेत ताब्यात देण्यापूर्वी जे. जे. हॉस्पिटल येथील पोलिसांनी तिच्या मृत्यूबाबत कोणावरही आक्षेप नसल्याची जबानी घेतल्याने लाड कुटुंब प्रचंड दबावाखाली जाऊन गेले काही दिवस मानसिक कोंडमारा सहन करीत होते. यासंदर्भात रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याकडून खातरजमा केली असता हा प्रसूतीदरम्यानचा मातामृत्यू असल्याची कबुली त्यांनी खेदाने दिली. सोनलची सासू या सगळ्या प्रकाराने व्यथित झाली असून संकेतचा संसार असा उद्ध्वस्त झाला असता एक नवे बाळ व तीन वर्षांची मुलगी यांच्या पालनपोषणाकडेही लक्ष द्यावे लागणार असल्याचे सांगून आम्हा गरिबांना न्याय मिळेल का, असा संतप्त सवालही तिने केला.