कृषी विज्ञान शास्त्रज्ञ आरेकर यांचे प्रतिपादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
आंब्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे व्यवस्थापन गरजेचे आहे. याकरिता बागायतदार शेतकर्यांनी या फवारणीचे नियोजन केल्यास जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकर्यांना होणार असल्याचे मत कृषी विज्ञान शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (दि. 20) पळस्पे येथे आंबा मोहोर संरक्षण अभियानात ते बोलत होते. कोकणातील काही पट्ट्यात आंबा पिकाची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आंब्याची उत्पादन क्षमता वाढवून शेतकर्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळावा या उद्देशाने पनवेल तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आंबा मोहोर संरक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते या ठिकाणी या अभियानाअंतर्गत माहिती दिली जात आहे. कृषी पर्यवेक्षक टी.एन.दोलतोडे यांच्या पुढाकाराने पनवेल तालुक्यात शासनाचा उपक्रम राबविला जात आहे. आंब्याला मोहोर आल्यावर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कीटक, आळ्या आदींचा प्रादुर्भाव होत असतो. अशावेळी या कीटकांचे योग्य वेळी व्यवस्थापन न केल्यास संपूर्ण मोहोर नष्ट होतो. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होते. अशा या कीटकांवर योग्यवेळी योग्य प्रमाणात कीटकनाशक औषधांची फवारणी केल्यास कीटक नष्ट होऊन आंब्याचा अधिक उत्पन्न घेता येऊ शकेल या संदर्भात महत्वाचे मार्गदर्शन आरेकर यांनी व्यक्त केले. या वेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशोतील शेतकरी उपस्थित होते. आंब्याची लागवड केल्यानंतर मोहोर आल्यावर काय काळजी घ्यावी यासंदर्भात पूरक माहिती या उपक्रमात देण्यात आली. पनवेल तालुक्यात 12 ठिकाणी अशाप्रकारच्या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी नानोशी, नेरे, चिंचवन, पळस्पे या चार गावांमध्ये हे मार्गदर्शन शिबिर यशस्वी झाले आहे. या वेळी कृषीपर्यवेक्षक टी.एन.दोलतोडे, कृषी सहाय्यक डी.एस. लाड, पी.बोर्हाडे, डी. एस. लवंडे, ए.डी.बुरकूल, वि. एच. पाटील, माजी सरपंच आर.गवंडी, कोंडीराम चोरघे, चंद्रकांत भगत आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात आहे. मार्च महिन्यात साधारणतः आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी तीन महिने आगोदरच शेतकर्यांना यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अभियान राबविले जात आहे.