नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येण्याची शक्यता आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने देशभरात केलेल्या सर्व्हेनुसार, पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे, तर काँग्रेसला फक्त 97 जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेसपेक्षा अन्य पक्षाच्या जागा जास्त येऊ शकतात असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त केला आहे. सर्वेक्षणातून लोकसभेच्या सर्व 543 जागांचा वेध घेण्यात आला आहे. त्यानुसार भाजपला 230 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस 97 जागांपर्यंत मजल मारेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मित्रपक्षासह भाजप (एनडीए)ला 275 जागा मिळतील, यूपीएला 147 जागा मिळतील, तर अन्य पक्ष 121 जागांपर्यंत मजल मारतील. अन्य पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसला 28, बीजू जनता दलाला 14, शिवसेनेला 13, समाजवादी पक्षाला 15, बसपला 14, राजदला 8, जदयुला 9 जागा मिळतील, असा अंदाज सर्वेक्षण सांगते. यावर आता चर्चा रंगतेय.