नागोठणे : प्रतिनिधी
येथील एसटी बसस्थानकासमोरील कमानीतून जोगेश्वरी मंदिर, ब्राम्हण आळीकडे जाणार्या रस्त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झाला असल्याने ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून धडपडतच मार्गक्रमण करावे लागते. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना विचारले असता, रस्ता तयार करून चार वर्षे लोटली असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायतीला येणे असलेला काही निधी उपलब्ध झाल्यावर रस्ता दुरुस्तीला निश्चितच प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डोलवीच्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून उपलब्ध झालेल्या पन्नास लाख रुपयांच्या निधीतून सन 2016मध्ये शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते व 10 मार्च 2016 मध्ये त्याचे उदघाटन करण्यात आले होते. याच कामांतर्गत या मुख्य रस्त्याचेसुद्धा डांबरीकरण करण्यात आले होते. याच मार्गावर पोलीस ठाणे, ग्रामपंचायत, टपाल अशी मुख्य कार्यालये असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्ता अगोदरच खड्डेमय झाला असतानाच पाऊस पडायला काही अंशी प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जाणार्या वाहनांमुळे खड्ड्यातील पाणी पादचार्यांच्या अंगावर उडत असल्याच्या घटना दिवसभर घडत असतात. तर, दहा ते सोळा सतरा वयोगटातील दुचाकीस्वार नागोठणे पोलिसांची कोणतीही भीती न बाळगता, याच मार्गावरून सुसाट वेगाने जात असतात व या खड्डेमय रस्त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असते.
पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यानंतर या खड्ड्यांच्या आकारमानात वाढ होईल. बहुसंख्य ग्रा. प. सदस्यांची ग्रामपंचायतीत वर्दळ असली तरी त्यांना या रस्त्याची दुर्दशा दिसत नाही का, असा नागरिकांचा सवाल असून या खड्ड्यांवर लवकरच मलमपट्टी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.