उरण : जीवन केणी
उरण तालुक्यात वाढत्या ऐद्योगिकीकरणामुळे नागरिकरणात झपाट्याने वाढ होत आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून संबोधल्या जाणार्या उरण तालुक्याच्या ठिकाणी जेएनपीटीच्या अनुषंगाने विविध बंदरे कार्यान्वित झाली असून, तालुका आयात निर्यातीचे केंद्र बनले आहे. ठिकठिकाणी मोठमोठी गोदामे साकारण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध
झाल्या आहेत.
मागील तीन वर्षांपासून जेएनपीटी बंदरामुळे सुरू असलेल्या अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीच्या कोंडीमुळे उरणच्या प्रवाशांना नवी मुंबई, मुंबई व ठाणे या मार्गावर दैनंदिन प्रवास करणार्या प्रवाशांना प्रवासात होणारा नियमित विलंब आणि व अपघातात उरण तालुक्यातील अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याने जेएनपीटी, एमएमएआरडीएच्या माध्यमातून सहा व आठ पदरी रस्त्यांची निर्मिती सुरू करण्यात आली असून, ही कामे
प्रगतिपथावर आहेत.
या महामार्गातील सर्वांत मोठा उड्डाणपूल असलेल्या करळफाटा येथील उरण-पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल जानेवारी 2020 अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातात अनेकांचे बळी गेले असून, अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळावेत या हेतूने उरण सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार व जेएनपीटी यांच्या विरोधातील याचिकेची दखल उच्च न्यायालयाने घेतल्याने जेएनपीटी टाऊनशिप येथे ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात आले आहे. शिवाय उरणमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्तपेढी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील अपघातग्रस्तांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
त्याचप्रमाणे उरण शहरापर्यंत रेल्वे प्रकल्प पोहचविण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून खारकोपर ते उरण या रेल्वे प्रकल्पाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर होऊ लागल्याने अवघ्या तीन वर्षांच्या अवधीत वाहतूक कोंडीत दैनंदिन प्रवास करणार्या प्रवाशांची प्रतीक्षा मार्गी लागेल, अशी आशा उरणवासीयांना निर्माण झाली आहे. उरण तालुक्यातील रांजणपाडा, नवघर व उरण येथील रेल्वे स्थानकांची कामे प्रगतिपथावर आहेत.
ओएनजीसी, एनएडी शस्त्रागार, बीपीसीएल, वीजनिर्मिती केंद्र व जेनपीटी आदी महत्त्वाचे केंद्र व राज्य सरकारचे विकसनशील प्रकल्प तालुक्यात कार्यान्वित आहेत. शिवाय जेएनपीटीच्या अनुषंगाने संपूर्ण उरण तालुक्यात मोठमोठी गोदामे निर्माण करण्यात आली असून, शिपिंग कंपन्यांसह अनेक सर्व्हेअर आणि आयात-निर्यातीच्या माध्यमातील शेकडो कंपन्याच्या कार्यशीलतेमुळे तालुक्यासह अनेक ठिकाणच्या कित्येक तरुणांना विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने उभरत्या उरण तालुक्यामुळे अनेकांना नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
-संपूर्ण तालुक्याला नवा लूक
उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरात मागील चार पाच वर्षांपासून गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या असून, नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. नवीनशेवा गावापासून ते चाणजे, मुळेखंड यांच्यासह फुंडे व बोकडविरा येथील सिडकोच्या हद्दीतही झपाट्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींमध्ये नव्याने नागरिक वास्तव्यसही येत असून, या उभारत्या उरण तालुक्याला नवा लूक निर्माण होत आहे.